डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वे मार्गावर वेगवेगळ्या दुर्घटनांच्या माध्यमातून मृत्यूचे तांडव सुरूच असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. डोंबिवली जवळच्या ठाकुर्ली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान जानेवारी ते ऑगस्ट या 7 महिन्यांच्या कालावधीत एकूण 125 जणांचा रेल्वे मार्गात पडून, रूळ ओलांडताना, लोकल-मेल-एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी वारंवार उद्घोषणा केल्या जातात. मात्र रेल्वेच्या सूचनांकडे प्रवासी व रेल्वे मार्गाच्या दुतर्फा राहणार्या रहिवाश्यांच्या वर्तणुकीत यत्किंचितही फरक पडत नसल्याने या मार्गावरील मृत्यूचे तांडव थांबणार तरी कधी, असा सवाल प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
प्रवाश्यांनी रेल्वे मार्गातून ये-जा करू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दुतर्फा 15 फूट उंचीच्या संरक्षित जाळ्या बसविल्या असल्या तरीही प्रवासी वा मार्गाच्या दुतर्फा राहणारे रहिवासी रेल्वे मार्गाचा वापर करत असल्याने रेल्वे प्रशासन हैराण आहे. कोपर रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा जिना, तसेच मध्य रेल्वे मार्गावर विस्तारीकरणाची कामे होणार असल्याने या रेल्वे स्थानकांच्या दुतर्फा 15 फूट उंचीचे संरक्षित कठडे बसविण्याची कामे प्रशासनाने हाती घेतली नाहीत. त्यामुळे कोपर पूर्व, आयरेगाव, म्हात्रे नगर भागातील बहुतांशी प्रवासी रेल्वे मार्गातून कोपर रेल्वे स्थानकावर येतात. याशिवाय परिसरातील आगासन, म्हातार्डेश्वर मंदिर परिसरातील रहिवासी रेल्वे मार्गातून रात्रं-दिवस ये-जा करत असेतात. अनेकदा रेल्वे मार्गातून चालताना समोरुन येणारी मेल, एक्स्प्रेस, लोकल कोणत्या रेल्वे दिशेकडून येते हे पादचार्याला कळत नाही. त्यामुळे तो गोंधळून जातो आणि या गडबडीत अपघात होतो, असे रेल्वे सुत्राने सांगितले. रेल्वे मार्गातून बेजबाबदारपणे ये-जा करणार्या प्रवाशांना पोलिस ठाण्यात आणून पोलिस वा रेल्वे सुरक्षा दलाचे समजत देतात. परंतु प्रवासी ऐकत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करू नका, असे रेल्वे प्रशासनातर्फे उद्घोषणेद्वारे नियमित आवाहन केले जाते. तरी प्रवासी त्यास दाद देत नसल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घटना घडत असल्याचे रेल्वे अधिकारी म्हणाला. प्रवाश्यांच्या जागृततेसाठी प्रवासी सुरक्षिता पंधरवडा राबविला जातो. रेल्वे प्रवासाची माहिती, प्रवाश्यांमध्ये जागृतता, रेल्वेने प्रवास करताना कोणत्या कारणाने अपघात होऊ शकतात, आदी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाश्यांना दिली जात असल्याचेही या अधिकार्याने सांगितले.