भाईंदर पुढारी वृत्तसेवा : मिरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डंपिंग ग्राऊंडमधून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी सुटून ती परिसरात पसरत असल्याने तेथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेला केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीतून पालिका डंपिंग ग्राऊंडमधून सुटणारी दुर्गंधी सुटू नये, यासाठी कचर्यावर सुगंधी द्रव्य फवारणी करणारी दोन अत्याधुनिक यंत्रे खरेदी करणार आहेत. यामुळे कचर्याची दुर्गंधी लवकरच सुगंधी होणार असल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.
या एका यंत्राची किंमत सुमारे 40 ते 45 लाख इतकी असून त्याला आयुक्त दिलीप ढोले यांनी मान्यता दिल्याचे उपायुक्तांनी सांगितले. पालिकेने 2005 पासून उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात डंपिंग ग्राऊण्ड सुरू केले आहे. त्याला येथील लोकांचा विरोध असताना ते इतरत्र स्थलांतर करण्याच्या आश्वासनामुळे लोकांनी आपला विरोध काहीसा मागे घेतला असला तरी स्थानिक कोणत्याही क्षणी त्यावर जन आंदोलन छेडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिकेच्या मोकळ्या राखीव भूखंडांवर प्रत्येकी 10 व 20 मेट्रिक टन कचरा हाताळण्याची क्षमता असलेल्या 7 मिनी डंपिंग ग्राऊण्डचा पर्याय शोधला आहे.
यापैकी तीन ठिकाणचे डंपिंग ग्राऊण्ड सुरू झाल्याचे सांगण्यात येत असून येथे टाकण्यात येणार्या ओल्या कचर्यापासून वीज निर्मिती केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत त्यातून किती युुनिट वीज निर्माण केली गेली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर उत्तन येथील डंपिंग ग्राऊण्ड सुमारे 70 एकर शासकीय जागेत सुरू करण्यात आले असता ते तेथील अतिक्रमणांमुळे सुमारे 50 एकरवर आले आहे. या डंपिंग ग्राऊण्डमध्ये दररोज शहरातील ओला व सुका असा प्रत्येकी सुमारे 400 व 150 मेट्रिक टन कचरा टाकला जातो. यातील ओल्या कचर्यातून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याने स्थानिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.
ओल्या कचर्यावर डिओडरन्टची फवारणी होत असली तरी ती तोकडी पडत असल्याने परिसरात दुर्गंधी जैसे असल्याचेच जाणवते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगाकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या 32 कोटी 75 लाखांच्या निधीतून दोन अत्याधुनिक फवारणी यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला केंद्र शासनाने देखील मान्यता दिली असून या यंत्रांद्वारे ओल्या कचर्यावर सुगंधी द्रव्याची सतत फवारणी केली जाणार आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी ऐवजी सुगंध दरवळणार असून ही दोन्ही यंत्रे येथे कायमस्वरुपी ठेवली जाणार आहे.
डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येणार्या ओल्या कचर्यात काही घातक कचर्याचा समावेश होत असल्याने दरवर्षीच्या उन्हाळ्यात त्यात निर्माण होणार्या मिथेन वायुमूळे कचर्याच्या ढिगार्याला आग लागण्याच्या घटना सतत घडत असतात. या घटना घडू नयेत, यासाठी त्या यंत्राद्वारे ओल्या कचर्यावर प्रामुख्याने उन्हाळ्यात पाणी देखील फवारण्यात येणार आहे. यामुळे आगीच्या घटना घडणार नसल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
हेही वाचा