ठाणे

ठाण्याचा आनंद आश्रम झाला सुना सुना!

अमृता चौगुले

ठाणे : शशिकांत सावंत :  'गद्दारांना क्षमा नाही', असे सांगणारा आनंद दिघे यांच्या जीवनपटावरील 'धर्मवीर' हा चित्रपट थिएटरमध्ये एक महिना गाजत असताना या ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडाची हवा देशभर पसरली आहे. तब्बल 29 आमदार घेऊन भाजपशासित राज्य गुजरातमध्ये दाखल झालेले एकनाथ शिंदे आणि दुसर्‍या बाजूला 'मातोश्री'वर 25 पेक्षा जास्त आमदारांनी हजेरी लावत सुरू केलेली जमवाजमव असा महाविकास आघाडीचा राजकीय सिलसिला सुरू असताना ठाण्याच्या शिवसेनेचे मूळ केंद्र असलेला 'आनंद आश्रम' आज सुना सुना झाला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या एकूण सहा आमदारांपैकी तब्बल चार आमदार हे सुरतला एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंदे समर्थक म्हणून रवाना झाले. ज्या ठाण्यात शिवसेना पहिल्यांदा मूळ धरून उभी राहिली, त्याच ठाण्यातील हे बंड शिवसेनेसाठी मोठा धक्‍का देणारे ठरले आहे.
ज्या बालेकिल्ल्यात शिवसेना रुजली, मोठी झाली, त्याच कोकणात एका मोठ्या बंडाने आकार घेतला. यापूर्वी दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या त्या शिंदेंच्या नाराजीच्या. मात्र ही नाराजी अशा भव्य बंडाच्या स्वरूपात पुढे येईल, असे कधी कोणाला वाटले नव्हते. एक खंदा शिवसैनिक म्हणून… कट्टर शिवसैनिक अशी ख्याती असलेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाण्याची शिवसेना विचलित झाली आहे. ज्या शिवसेनेसाठी आनंद दिघेंनी आपले आयुष्य पणाला लावले, घराघरांत शिवसेना पोहोचण्यासाठी रक्‍ताचे पाणी केले, त्याच शिवसेनेच्या शिस्तीमध्ये वाढलेला इथला शिवसैनिक एका बाजूला भगव्याशी इमान राखू पाहात आहे, तर दुसर्‍या बाजूला आपल्या नेत्याची पाठराखणही करू पाहात आहे.  ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक यापूर्वी निवडून आले आहेत. या महापालिकेवर शिवसेनेची जवळपास 30 वर्षे सत्ता आहे, तर बाजूच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेवरही शिवसेनेचा भगवा डौलाने फडकताना दिसतो आहे.

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे हे मूळचे शिवसैनिक 'मातोश्री'शी इमान राखून आजही कार्यरत आहेेत, तर दुसर्‍या बाजूला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह चार आमदार बंडात सहभागी आहेत. ठाण्याचे 70 टक्के शिवसेनेचे माजी नगरसेवक हे सुरतपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता आहे. हे बंड शमले नाही तर शिवसेनेची दोन उभी शकले होतील हे जवळपास निश्‍चित आहे. या बंडाची व्याप्ती ठाणे जिल्ह्यात भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, डोंबिवली, मिरा-भाईंदर, ठाणे शहर, नवी मुंबई या सर्वच जिल्ह्यांतील कानाकोपर्‍यात पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार बंडात सहभागी झाल्याने या जिल्ह्यातही शिवसेनेला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.

मध्य प्रदेशनंतर ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात सुरू झाले आणि त्यांना बिनीचे शिलेदार सापडले ते अस्सल ठाणेकर एकनाथ शिंदे. यापूर्वी राजस्थानमध्ये हा प्रयोग फसला. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झाला. आता वेळ महाराष्ट्राची आहे. ज्या ठाण्यात शिवसेना रुजली, त्याच ठाण्यातून या बंडाची सुरुवात झाली आहे. आता पुढे काय? हा प्रश्‍न प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि राज ठाकरे यांचे बंड झाल्यानंतरही शिवसेना ही वाढली.

मात्र त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर नव्हती. आता सत्तेचा सारीपाट मांडताना शिवसेनेचा स्वाभिमान एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला सत्ता समीकरणे, असा नवा पेच घेऊन हे बंड उभे राहिले आहे. शिवसेनेत जे मोठे झाले, शिवसेनेने ज्यांना उभे करण्यासाठी आपली सर्व ताकद लावली, असेही काही मोहरे या बंडाच्या मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे हे बंड शिवसेनेला कुठे नेणार, याकडे ठाण्याचा शिवसैनिक लक्ष ठेवून आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT