ठाणे

ठाणे: शरद पवारांवर टीका करणार्‍यांनी लायकी तपासावी;आनंद परांजपे यांचे जोरदार प्रत्युत्तर

मोनिका क्षीरसागर

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: शिवसेना हा उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे. त्यांचा पक्ष कसा चालवायचा हे त्यांना माहीत आहे आणि ते सक्षमही आहेत. त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पण, आमच्या नेत्यांवर टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही. पवार यांच्यावर टीका करणार्‍या श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी आपली लायकी तपासावी आणि नंतरच टीका करावी, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.

परांजपे म्हणाले की, खा. शिंदे आणि माजी महापौर म्हस्के यांनी राष्ट्रवादीवर बेताल आणि बेछुट आरोप केले. खरंतर खा. शिंदे हे अपरिपक्‍व आहेत, हे आपणाला माहित होते. पण त्यांना ठाणे जिल्ह्यातील राजकारणाविषयी पूर्ण माहिती नाही, हेदेखील आता त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या कुठल्याही कमिटीची पूर्तता केली नाही. सातत्याने राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचे काम हे पालकमंत्री शिंदे यांनी केले.

नरेश म्हस्के म्हणाले की राष्ट्रवादीचे नगरसेवक त्रास द्यायचे. पण प्रत्येक महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना न बोलू देणे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांना न बोलू देणे, विकासकामांमध्ये राजकारण करणे, किंबहुना कोरोना काळात लसीकरणातही राजकारण करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लस कमी देणे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारणही म्हस्के यांनी केले. सध्या शिवसेनेत जे चालू आहे. ते मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेला त्यातून बाहेर काढतील.

शिवसेनेचाच मुख्यमंत्रीच या राज्यामध्ये राहिल, याबाबत तीळमात्रही शंका नाही. पण, शरद पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप आपण करू नयेत. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांची ती लायकी नाही. आपण आपल्या पक्षात किती निष्ठावंत आहोत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हस्के करीत आहेत. नारायण राणे हे जेव्हा फुटले तेव्हा हेच म्हस्के सोबत गेले होते. कायमची त्यांची सवय आहे की जे फुटतात त्यांच्याबरोबर जातात आणि नंतर परत पक्षात येतात. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की पवारसाहेबांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही.

गुवाहाटीला जाण्यामागे गौडबंगाल काय? महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्येही भाजपची सत्ता आहे. पण, एकनाथ शिंदे हे गुवाहाटीलाच का गेले ? या मागेही एक कारण आहे. गुवाहाटी जवळच कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तंत्र मंत्र याच्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ते गुवाहाटीलाच गेले आहेत. हे आता त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाही समजले आहे, असे सांगून आनंद परांजपे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT