ठाणे

ठाणे : मोटारसायकल चोरणार्‍या दोघांना अटक; ठाणे, मुंबईतील 3 गुन्ह्यांची उकल

अनुराधा कोरवी

ठाणे : पुढारी डेस्क मुंबई व ठाण्यात मोटारसायकल चोरणार्‍या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई मुंबई पोलीस दलाच्या युनिट 7 च्या पथकाने केली. या कारवाईमुळे मुंबईतील 2 तर ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली असून 2 लाख 60 हजार रुपयांच्या तीन मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई व ठाण्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांसह स्थानिक पोलीस आरोपींचा शोध घेऊ लागले. कारवाई सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 7 च्या पथकातील हवालदार मोरे यांना मोटारसायकल चोरांची माहिती खबर्‍याने दिली.

सदर माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रिया थोरात पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोघ सिद्ध ओलेकर व पोलीस पथकांनी भांडुप येथे सापळा लावून आरोपी अदनान अश्मत खान (21), नूर समशेर सय्यद उर्फ सुलतान (18 वर्ष 7 महिने) यांना अटक केली.

त्यांच्या ताब्यात असलेली दुचाकी मुलुंड चेक नाका परिसरातून चोरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तसेच या आरोपींनी पवई व ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी पवई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT