ठाणे

ठाणे, मुंबई, नवी मुंबईची वाहतूककोंडी सुटणार .. एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  ठाणे, मुंबई तसेच नवी मुंबईची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने तब्बल 17 हजार कोटींचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून यामुळेएमएमआर क्षेत्रातील वाहतूककोंडी
कमी होईल असा दावा एमएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्रस्तावित करण्यात आला असून मेट ?ो, दळणवळण, वाहतूक सुधारणा तसेच नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईलाच लागून असलेल्या ठाणे शहरातील तीनहात नाका येथील वाहतूक सुधारणा प्रकल्पासाठी तब्बल 289 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. तर यापूर्वी कोट्यवधींचा खर्च करूनही रायलादेवी तलावाच्या
सौंदर्यीकरणासाठी 39 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

वाहतूककोंडी ही आजच्या तारखेला सर्वच प्रमुख शहरांची डोकेदुखी झाली असून वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांची एक महत्वाची बैठक झाली असून या बैठकीमध्ये ठाणे, मुंबई तसेच नवी मुंबईची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तब्बल 17 हजार कोटींचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या मास्टर प्लॅनचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले. हे सादरीकरण एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही. आर श्रीनिवास यांनी केले.

यामध्ये प्रामुख्याने या तीन शहरांची वाहतूक कोंडी सोडवण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी येथील प्रकल्पांना देखील चालना देण्यात येणार आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात
वाहतूककोंडी होत असून सर्वाधिक वाहतूक कोंडी हि तीन हात नाका परिसरात होत असते. हि वाहतूककोंडी
कमी करण्यासाठी उड्डाणपुलावर उड्डाणपूल बांधणे, भूमिगत रस्ता करणे, उड्डाणपुलाला लागून नवीन रस्त्याची निर्मिती करणे, असे अनेक पर्याय ठाणे महापालिकेच्या वतीने सुचवण्यात आले होते. 2016 मध्ये हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर मे 2017 रोजी या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र या
प्रकल्पाला निधी न मिळाल्यामुळे या प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी हा प्रकल्प
आता स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत घेण्यात आला आहे.

रस्त्यांचाही विकास होणार

विशेष म्हणजे ठाणे शहरातील येऊर डोंगररांगांच्या पायथ्याशी रस्त्याच्या कामांना आणि त्याला अपेक्षित असलेल्या 481 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय रकमेचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात
आला आहे. त्यामुळे ठाण्यातील रस्त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगिण विकासासाठी एमएएमआरडीए नेहमीच कार्यरत असते. नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे मुंबई महानगराच्या विकासाला अजून गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रकल्पांचा सुसाध्यता अहवाल (फिजिबिलीटी रिपोर्ट) आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्याकरीता मान्यताही या बैठकीत देण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आली आहे.

उड्डाणपुलावर आणखी एक उड्डाणपूल नियोजन

या प्रस्तावानुसार उड्डाणपुलावर आणखी एक उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून याशिवाय हा त्या उड्डाणपुलाला दोन बाजू जोडण्यात येणार होत्या. उड्डाणपुलाच्या बाजूने ज्या दोन बाजू नियोजित करण्यात आल्या
होत्या त्यामध्ये एक बाजू इटर्निटी मॉल कडून तर दुसरी बाजू हरिनिवास सर्कलकडून करण्यात येणार होती. मात्र
निधीच्या अभावी हा प्रकल्प पूर्णत्वास येऊ शकलेला नाही. आता पुन्हा नव्याने हा प्रकल्प एमएमआरडीएच्या
वतीने राबवण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएने 289 कोटींची तरतूद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT