ठाणे; पुढारी डेस्क : मुंबईत खरेदीसाठी येत असलेल्या एका महिलेचे 7 लाख रुपये लुटणार्या तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे आरोपी मध्य प्रदेशचे (एमपी) असून यात एका महिलेचाही समावेश आहे. कारवाईदरम्यान या आरोपींकडून लुटलेल्या रकमेतून खरेदी करण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलीस सूत्रांनी सांगितले.
मूळची मध्य प्रदेशात राहणारी चंचल केशरवानी ही पाटील-पुत्र एक्सप्रेसने 1 जून रोजी खरेदीसाठी मुंबईतील कॉफ्रेड मार्केट येथे येत होती. प्रवासादरम्यान मध्यरात्रीच्या वेळी तिला झोप लागली. हीच संधी साधून चोरांनी तिच्या बॅगेतील 7 लाख रुपयांची रोकड पळवली. दरम्यान पहाटेच्या सुमारास चंचल हिला जाग आली. तिने बॅग तपासली असता पैसे चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. कल्याण स्थानकात उतरताच तिने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे वपोनि अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि साठे, उपपिनरीक्षक दीपक शिंदे व गुन्हे शाखेचे पथक करू लागले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी मध्य प्रदेशचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी सरिता पटेल (29), अलोक दीक्षित (34), रोहीत कोरी (32) यांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून लुटलेल्या पैशांतून खरेदी केलेले 4 लाख 90 हजारांचे विविध सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.