डोंबिवली; बजरंग वाळुंज : डोंबिवली नगरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे शहर कोणत्याही राजाने, सरदाराने किंवा खोताने वसवले नसून सामान्य लोकांच्या गरजेतून या शहराची निर्मिती झाली असल्याचे मानले जात असले तरी या नगरीच्या इतिहासासह तिचे वयोमान उलगडणारा पुरावा पुरातन वास्तू असलेल्या शिलालेखातून समोर येतो. या शिलालेखातील मजकुरावरून डोंबिवलीचे वय जवळपास 600 ते 650 वर्षे असावे असा अंदाज आहे. डोंबिवलीचा केंद्रबिंदू असलेल्या मानपाडा रोडला गावदेवी मंदिर आहे. या मंदिराजवळ असलेला
शिलालेख हा एक ऐतिहासिक पुरावा मानला जातो.
या शिलालेखाच्या मजकुरावरून हा शिलालेख इ. स. 1396 सालातला असावा असा तज्ञांचा तर्क आहे. हा शिलालेख पूर्वी शांताबाई काळू
दागुजी यांच्या वाडीत रस्त्यालगत होता. तथापि रस्ता रुंदीकरणादरम्यान तो प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये हलवण्यात आले. स्थानिकांनी
विरोध केल्यानंतर हा शिलालेख पुन्हा 6 मार्च 1994 रोजी कल्याण महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त टि. चंद्रशेखर यांच्याहस्ते
गावदेवी मंदिराजवळ ठेवण्यात आला.
1857 साली डोम्बिवली स्टेशन अस्तित्वात आले. त्यानंतर त्याला डोंबिवली नाव पडले याबद्दलही बरेच तर्कवितर्क लावण्यात येतात.
सुरुवातीला रेल्वेच्या तिकिटावर डीमाली असे नाव छापलेले असायचे. जसे पाथर्ली ही पाथरवटांची आळी, ठाकुर्ली ही ठाकुरांची
आळी, तसेच डोंबिवली ही डोम्बांची आळी असे पूर्वी म्हटले जायचे. तसेच 1730 सालच्या कागदपत्रात डोम्बोली असाही उल्लेख आढळतो. येथे मुळची वस्ती डोम्बांची असावी असा तर्क लावण्यात येतो. याशिवाय हे शहर खोलगट भागात असल्याने ज्याला
हुवाली म्हणतात. त्यावरूनच डोम्बोली आणि हुवाली या दोन्ही शब्दांची फोड करून डोंबिवली हे नाव पडले असावे, असाही अंदाज
व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या फडके रस्त्याने डोंबिवलीतील तरुणाईला भूरळ घातली जाते त्या रस्त्यालाही इतिहास आहे. 1857 च्या काळात स्टेशनवर
येण्याजाण्यासाठी रस्ता नाही हे ओळखून त्यावेळचे लोकल बोर्डाचे लोकनियुक्त अध्यक्ष सखाराम गणेश तथा बापूसाहेब फडके
यांनी पुढाकार घेत एक रस्ता तयार केला. या रस्त्याला त्यांचेच नाव द्यावे, असा ठराव गावकीच्या सभेत झाला तोच आजचा फडके
रस्ता आहे.
लेखाचा काळ पहिल्याच ओळीत निर्दिष्ट केला आहे. तो 'सकु 1318 ईजरत 798'असा आहे. तेव्हा इंग्रजी कालगणनेनुसार हा शिलालेख इ. स. 1396 मधील आहे, हे स्पष्ट होते. शिलालेखाचा विषय पाहता तो शिरवली गावाचे दान देण्यासंबंधी आहे. या काळात श्री आलुनाकु या नावाचा राणा म्हणजे राजा ठाण्यावर राज्य करीत होता. त्याचे सर्व व्यापारी हाना नाखुआ, कर्णिक, प्रोमलप्रो व आवलप्रो हे अधिकारी होते. त्यांच्या आमदानीत हे दानपत्र केले आहे. या आलुनाकु राणाने आपला सेवक जसवंत दळवी याला आठ गावांमधील (अष्टागर) डोंबिवली नावाचे गाव दान केले आहे. सहाव्या ओळीतील सर्व अक्षरे खराब झाल्यामुळे ती व्यवस्थित वाचता येत नाहीत. त्यामुळे ही आठ गावे कोणती, हे सांगणे कठीण ठरते
ठाण्याचा हा आलुनाकु राणा याला आहवामल व महाराजाधिराज अशा बिरूदावली या शिलालेखात देण्यात आल्या आहेत. अहवामल याचा अर्थ युद्धातील मल्ल, अत्कृष्ट योद्धा असा होतो. यावरून त्याचे त्याकाळातील युद्धनैपुण्य व श्रेष्ठ अधिकारपद कळून येते. शकाबरोबर हिजरी सनाचा अल्लेख आला आहे. यावरून त्या विभागावर मुसलमानी सत्ता होती, असे दिसते.
हा आलुनाकु राणा कोण याचा विचार करणे जरूरीचे आहे. कोकणावर राज्य करणारे राजे हे शिलाहार वंशातील असून ते मांडलिक होते असे दिसते. परंतु या आलुनाकु राजाची महाराजाधिराज ही बिरूदावली पाहता तो स्वतंत्र राजा असावा असे वाटते.
शिलालेखावर एक नजर…
या शिलालेखाची शिळा अडीच फूट उंच व सव्वा फूट रूंद आहे. शिळेवर प्रथेप्रमाणे वरच्या भागावर चंद्र व सूर्य यांची चिन्हे कोरली आहेत. खाली तळाला गद्धेगाळीचे चित्र कोरले आहे. ही चिन्हे यादव व शिलाहार घराण्यांच्या लेखांतून सतत दिसून येतात. पहिल्या आठ ओळी देवनागरी म्हणजेच मराठीत आहेत. अर्वरित पाच ओळींतील दोन श्लोक संस्कृतमध्ये आहेत.
साधारणपणे एका ओळीत 17 अक्षरे असून प्रत्येक अक्षराची उंची अंदाजे एक इंच आहे. पाण्यापावसाच्या मार्यामुळे व ग्रामस्थानी देव मानून सतत फासलेल्या शेंदूरामुळे शिलालेखावरील अक्षरे खराब झाली आहेत. त्यामुळे लेखाचे वाचन करणे
कठीण होऊन बसले आहे. त्यातच मध्यंतरी या शिलालेखाला शनीची मूर्ती समजून त्यावर तेल अर्पण करून पूजा केली जात होती.