ठाणे

ठाणे : खून करून मृतदेह तलावात फेकणार्‍या दोघांना अटक

दिनेश चोरगे

अंबरनाथ; पुढारी वृत्तसेवा :  किरकोळ वादातून उल्हासनगरातील विशाल राजभर या तरुणाची पाच जणांकडून हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह अंबरनाथ मधील जावसई तलावामध्ये गोणीमध्ये भरून टाकण्यात आला होता. याबाबतचा तपास मागील काही
दिवसांपासून पोलीस करीत होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या हत्येतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर तीन आरोपींचा शोध अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उल्हासनगरच्या हनुमाननगर परिसरात राहणार्‍या विशाल राजभर याची हत्त्या करून त्याचा मृतदेह अंबरनाथच्या जावसई तलावात
फेकण्यात आला होता. 4 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. याबाबतचा गुन्हा 5 ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त जगदीश सातव यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन हत्येतील दोन आरोपी अटक करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते उपस्थित होते.

या हत्येतील आरोपी रोशन साहनी व एका अल्पवयीन आरोपीला अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर इतर तीन आरोपींचा शोध सुरु असल्याचे एसीपी जगदीश सातव यांनी सांगितले. हत्या झालेला विशाल राजभर याला सचिन चौहान याने त्याच्या साथीदारांसह जीवे ठार मारून त्याचा मृतदेह तलावात फेकून दिल्याचे या घटनेतील आरोपी रोशन सहानी याने सांगितल्याची
माहितीही पोलिसांनी दिली.

काय आहे प्रकरण

विशाल राजभर आणि मुख्य आरोपी सचिन चौहान यांच्यात जुने वाद होते. याचा राग मनात धरून सचिन चौहान याने अजय
जैस्वार, रोशन सहानी, समीर सिद्दिकी उर्फ छोटा बाबू आणि एका अल्पवयीन मुलाच्या साथीने विशाल राजभर याला अंबरनाथच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी परिसरातील पडक्या खोल्यांजवळ लोखंडी रॉडने शरीरावर मारहाण करून मारले, त्यात तो मरण पावला होता. नंतर विशालचा मृतदेह एका गोणीमध्ये भरून तारेच्या वायरने आणि साडीच्या तुकड्याच्या सहाय्याने बांधून तो तलावात फेकून देण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT