भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : बांधा वापरा हस्तांतरीत करा या पद्धतीने 354 कोटी खर्च करून 2016 मध्ये भिवंडी- वाडा- मनोर हा रस्ता तयार करून टोल आकारणी सुरू झालेल्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवर होणार्या अपघातांमुळे यमसदनी
घेऊन जाणार रस्ता ठरला आहे. दुर्दैव म्हणजे खासगीकरणातून रस्त्याची निगा दुरुस्ती न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्यावरील खड्ड्यांचे दुर्दैव आज ही कायम आहे.
भिवंडी-वाडा-मनोर हा 64 किमी लांबीचा राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करून रस्ता विकसित करण्याचे काम बीओटी पद्धतीने सुप्रीम इन्फ्रास्ट्रकचर कंपनीस 2012 मध्ये देण्यात आले. सुरुवातीपासून या रस्त्या बाबत ओरड होत असताना 2016 मध्ये रस्ता तयार होऊन टोल अकारणीस सुरवात झाली. परंतु सदर कंपनीने या रस्त्याच्या निगा दुरुस्तीकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. ज्यामुळे अनेक अपघात या मार्गावर झाले आहेत.2016 ते आज पर्यंत तब्बल 400 जणांचा हकनाक बळी या रस्त्यावरील खड्डयांनी घेतले असून अनेक जण जायबंदी होऊन बसले आहेत. असे असताना या रस्त्यावरील खड्ड्यांचा दुर्दैवी फेरा अजून काही संपला नाही. या रस्त्यावर टोल वसूल करणार्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक अपघात होत असताना अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आली. ज्यामुळे जनक्षोभ टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 11 ऑक्टोबर 2019 मध्ये टोल वसुली बंद करून सदर रस्ता कंपनी कडून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ताब्यात घेतला. परंतु त्यानंतर ही दुरुस्ती रखडलेलीच राहिली आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे टोल वसुली करणार्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कडील काम सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून घेतले परंतु त्या विरोधात कंपनी न्यायालयात गेल्याने आता राज्य शासनाकडून सदर रस्ता काँक्रीटीकरण करण्याच्या हेतूने पुन्हा एकदा बीओटी तत्वावर दिला जाणार आहे. त्यामुळे तूर्तास सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता मजबुतीकरणाच्या माध्यमातून न बनवीत फक्त खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे रस्ता काँक्रीटीकरण झाल्यानंतर तरी या रस्त्यावरील प्रवास सुखकर व्हावा अशीच येथील
नागरीकांची अपेक्षा आहे.
भिवंडी-वाडा महामार्गावरून वर्षानुवर्षे प्रवास करताना या रस्त्यावरचे खड्डे कधी संपतच नाहीत,
अनेकवेळा खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचे आम्ही ऐकत होतो परंतु याच खड्ड्यांमुळे माझ्या
वडिलांचा जीव जाईल याची कल्पना देखील केली नव्हती.
– आदिती काबाडी, अपघातग्रस्ताची मुलगी