ठाणे; नरेंद्र राठोड : किडनी रॅकेट चालवणार्या टोळ्या काही धनदांडग्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना किडनी मिळवून देतात. त्यासाठी गरजू आणि गरिबाला हेरले जाते. कायदेशीर प्रक्रियेत अडथळे नकोत म्हणून किडनी देणार्यास रुग्णाचे नातेवाईक दाखवण्यात येते. त्यासाठी बनावट दस्तावेज बनवले जातात. राज्यात आतापर्यंत झालेल्या 40 टक्के किडनी ट्रान्सप्लांट प्रकरणात अशाच प्रकारे किडनी देणार्यास रुग्णाचे नातेवाईक दाखवले गेल्याचा अंदाज ठाण्यातील एका निवृत्त सिव्हिल सर्जनने व्यक्त केला.
किडनी ट्रान्सप्लांट करणार्या रुग्णालयांना देखील ही बाब बहुतांश वेळा माहीत असते. मात्र पैशाच्या जोरावर हा सारा गैरकारभार सर्रास चालतो. किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी केल्यास अनेक बोगस प्रकरण समोर येतील, असेही या सर्जनने सांगितले.
किडनी रॅकेट प्रकरणात एका किडनीचा दर 20 ते 80 लाखांपर्यंत मोठी रुग्णालये घेत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या तपासात आणखी अनेक प्रकरणे उजेडात येत असल्याने पोलिसांनी हा तपास आणखी गांभीर्याने सुरू केला आहे. मल्टी स्पेशीलिटी रुग्णालये या प्रकरणात अडकल्याने तपासावरही दबाव येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
किडनी रॅकेट प्रकरणात सर्वाधिक संदिग्ध भूमिका प्रत्यारोपण करणार्या हॉस्पिटलची असल्याचे एका पोलिस अधिकार्याने सांगितले. पुणे किडनी रॅकेट प्रकरणात तीन आणखी रुग्णालयांची नावे समोर आली आहेत. त्यात ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या नावाचा समावेश आहे. हे हॉस्पिटल नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर महिलेच्या पोटात कापडी मॉप (फॉरेन बॉडी) राहिल्याचा धक्कादायक प्रकार या रुग्णालयात नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतर किडनी रॅकेट प्रकरणातही नाव आल्याने रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, अशी अनेक रुग्णालये कायद्याची चौकट तोडून बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. हॉस्पिटल प्रशासनाला किडनी देणारा व घेणारा नातेवाईक नसल्याची कल्पना असून देखील बहुतांश वेळा पैशाच्या जोरावर प्रत्यारोपण केले जातात. अशा हॉस्पिटलची चौकशी झाल्यास अनेक बेकायदेशीर प्रकरणे उजेडात येतील, असे जाणकार सांगतात.
पुणे आणि ठाणे या दोन नामांकित शहरांमध्ये या किडनी रॅकेटची पाळेमुळे असल्याने ठाणे आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मोठ्या रुग्णालयांच्या या रॅकेटमध्ये सहभागी असलेले दलाल यांची चौकशी सुरू झाली आहे. काही वेळा रस्त्यावरील गरीब, भिक्षुकांनाही हे दलाल रॅकेटचा भाग बनवत आहेत.
किडनी रॅकेट प्रकरणातील दलाल अभिजित घटणे, रवींद्र रोडगे यांना पुण्यात मे महिन्यात अटक झाली होती. या दलालांनी बदलापूर येथील एका डॉक्टरच्या वडिलाला व पंढपूरमधील एका व्यक्तीला किडनी मिळवून दिल्याचे उघडकीस आले आहे.
चेन्नईतील एक व्यक्ती आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा बळी ठरली आहे. 29 वर्षीय यासीर अहमद बाशाच्या म्हणण्यानुसार, पत्नीच्या उपचारासाठी त्याने 7 लाखांचे कर्ज घेतले होते. रिक्षा चालवून कर्ज परत फेडणे शक्य नव्हते. पैसे कमवण्यासाठी तो मुंबईला आला. 2014 मध्ये त्याने काही काळ कॅब चालवली. पण पुरेशी कमाई होईना. नोकरीच्या शोधात यासीर हळूहळू आंतरराष्ट्रीय किडनीच्या रॅकेटमध्ये फसला. तो पहिल्यांदा अहमदाबादला गेला तेव्हा त्याला रक्ताचे नमुने मागितले. आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी चाचणी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्याला कैरो येथे पाठवण्यात आले. तेथे एका किडनी रॅकेटमध्ये फसवले गेले. त्याची किडनी काढण्यात आली.