कसारा; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबईला जाणार्या नवीन कसारा घाटात मका घेऊन जाणार्या एमएच 18 बीजी 6789 या ट्रकने चाळीसगावहून मुंबईकडे केळी घेऊन जाणार्या एमएच 48 ए वाय 4295 या आयशर टेम्पोला धडक दिल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असुन या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले.
सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास कसारा घाटात अपघात झाल्याची माहिती मिळाली असता आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य शाम धुमाळ, प्रकाश शिंदे व देवा वाघ हे तात्काळ नवीन कसारा घाटातील धबधबा पॉईंटवर पोहचले. अपघात भीषण असल्याने 108 रुग्णवाहिकाला कॉल देत ती बोलवून घेण्यात आली होती. यानंतर महामार्ग पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. अगोदर पोहचलेले सदस्य प्रकाश बाहेर टीमला सर्व माहिती दिली. टीमने अडकलेल्या इसमास बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. पहाटे अंधार असल्याने व त्यात पाऊस असल्याने मदतकार्यात आडथळे निर्माण होत होते. वळणदार रस्ता असल्याने धोकादायक परिस्थितीत 2 तासाच्या प्रयत्नानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमला आयशर टेम्पो मध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढण्यास यश आले.
दोन तासाच्या प्रयत्नांनंतर अडकलेल्या जखमी चालक पप्पू यादव बाहेर काढले. त्याला 108 च्या डॉक्टरने तपासले असता तो मयत असल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणी कसारा पोलिसांनी धडक देणार्या ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.