ठाणे

घरगुती सिलिंडर ठरतात विध्वंसास कारणीभूत; दोन वर्षांतील 8 दुर्घटनांत 11 जखमी

अनुराधा कोरवी

डोंबिवली : बजरंग वाळुंज कंपन्यांकडून वितरीत होणार्‍या घरगुती सिलिंडरमधून गॅसची गळती होऊन लागणार्‍या आगीनंतर होणार्‍या स्फोटांत जीवित व वित्तहानीच्या दुर्घटना मानवी जीवनास धोकादायक ठरत आहेत. हेच घरगुती सिलिंडर विध्वंसास कारणीभूत ठरत असल्याच्या घटना कल्याण-डोंबिवलीत गेल्या दोन-अडीच वर्षांत लागोपाठ 8 ठिकाणी घडल्या आहेत. या 9 दुर्घटनांमध्ये लाखो रुपयांची हानी झाली असून 11 जण जायबंदी झाले आहेत. या दुर्घटनांमध्ये वृद्ध, गृहिणी व बालकांचाही समावेश प्रकर्षाने जाणवतो आहे.

पश्चिम डोंबिवलीत एका बैठ्या चाळीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एक वृद्ध होरपळला होता. या दुर्घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पश्चिम डोंबिवलीतील गायकवाडवाडी परिसरात झाली. तेथील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या घरात घरगुती गॅस सिलिंडरच्या अचानक झालेल्या स्फोटात वृद्ध गृहिणीसह तीन जण जखमी झाल्याची घटनेनंतर अशा दुर्घटनांचा दैनिक पुढारीने मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.

9 एप्रिल 2018 रोजी घरगूती गॅस सिलिंडर लिक होऊन लागलेल्या आगीत 5 जण भाजल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील भोईर वाडीत घडली होती. 19 एप्रिल 2018 रोजी डोंबिवली पश्चिमेत स्टेशनजवळच्या महात्मा फुले रोडला असलेल्या डोंबिवली दरबार या हॉटेलमधील गॅस सिलिंडर लिकेज झाल्याने या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. 3 जानेवारी 2021 रोजी कल्याणठाकुर्ली रेल्वे मार्गावर असणार्‍या कचोरे गावातील टेकडीवरील झोपडीध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. 5 जानेवारी 2021 रोजी कल्याण जवळच्या योगीधाम परिसरातील एका घरात झालेल्या गॅस गळतीनंतर ती दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या मेकॅनिक किसन मोहन राम याने सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याने दुरुस्ती दरम्यान गॅसने पेट घेतला.

8 जानेवारी 2021 रोजी कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या पिसवली गावातील श्री कॉलनी चाळीमध्ये राहणार्‍या लक्ष्मी साहू या स्वयंपाक करत असताना सिलेंडर संपल्याने त्यांनी लावलेला दुसरा सिलेंडर लिकेज असल्याने त्यातून बाहेर पडणार्‍या गॅसने लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीची झळ चाळीतील अन्य 3 घरांनाही पोहोचली.

19 मे 2021 रोजी मानपाडा पोलिसांनी गॅस सिलेंडरमध्ये अफरातफर करणार्‍या बेल्लप्पा मंगप्पा ईरदिन (43, रा. लोढा हेवन, भवानी चौक, डोंबिवली) आणि महेश गुप्ता (35, रा. सिद्धिविनायक बिल्डिंग, सांगाव, डोंबिवली) या दोघांवर फौजदारी कारवाई केली. काळाबाजार करण्यासाठी केल्या जाणार्‍या अशाच रिफिलिंगमुळे सिलिंडरमधून गॅस गळती होऊन दुर्घटना घडत असतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली.

29 जून 2021 रोजी ठाकुर्ली पूर्वे कडील म्हसोबा नगरातल्या बैठ्या चाळीत झालेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात प्रकाशचंद कुस्तीमिया (70) आणि अरविंद कुस्तीमिया (32) हे बाप-लेक जबर होरपळले. 17 सप्टेंबर 2021 रोजी कल्याण पश्चिमेकडे असलेल्या कोळीवली गावातील शिसोदिया आर्केड या 7 मजली इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या बैनिवाल कुटुंबियांच्या घरात कृष्णा हे एकटेच असताना अचानक गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागली. 17 जुलै 2022 रोजी पहाटेच्या सुमारास पश्चिम डोंबिवलीतल्या रेती बंदर क्रॉस रोडला असलेल्या उमेश नगरमधील काशिनाथ निवास चाळीतील 4 क्रमांकाच्या बैठ्या घरात गॅस सिलेंडरचा शक्तिशाली स्फोट झाला.

या सर्व घटना ताज्या असतानाच मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी रात्री पश्चिम डोंबिवलीतील गायकवाड वाडीतल्या पारसनाथ को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील तळ मजल्यावर राहणार्‍या माणिक मोरवेकर यांच्या घरात घरगुती सिलेंडर गॅस लिक झाल्यामुळे स्फोट झाला. त्यात माणिक यांची पत्नी मनीषा मोरवेकर (60) यांच्यासह त्याच सोसायटीतल्या पहिल्या मजल्यावर राहणार्‍या उर्सुला लोडाया (32) आणि त्यांचा मुलगा रियांश (5) हा चिमुरडा जखमी झाला. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

अपघात टाळण्यासाठी…

या संदर्भात तज्ज्ञांकडून उपयुक्त माहिती देण्यात आली. गॅस सिलिंडर नेहमी जिथे खेळती हवा असेल आणि उष्णता नसेल अशा ठिकाणी ठेवावा. गॅस सिलिंडर नेहमी उभा ठेवावा, आडवा ठेवू नये. गॅसची शेगडी आयएसआयचा शिक्का असलेली असावी आणि ती नेहमीच गॅस सिलिंडरपेक्षा वरच्या पातळीवर ठेवावी. गॅसच्या शेगडीसह सिलिंडरसुद्धा नीट बंद करावा. गॅसच्या सिलिंडरशी खेळ करू नये. काही बिघाड झाला असल्यास तो स्वत:च दुरुस्त करण्याच्या फंदात पडू नये. या बाबतीत पुरवठादाराकडे तक्रार करावी, म्हणजे या गोष्टी
हाताळणारा अनुभवी माणूस तुमच्याकडे पाठवला जाईल.

स्वयंपाकघरात सुती कपडे घालणे केव्हाही अधिक सुरक्षित आहे. मात्र गॅसवरील भांडे उतरवताना कधीही दुपट्टा, साडीचा पदर, इत्यादीचा वापर करू नये. ते धोकादायक ठरू शकते. गॅसची शेगडी, गॅस सिलिंडर, या दोघांना जोडणारी रबरी नळी, बर्नर, इत्यादी गोष्टी नियमितपणे तपासून पाहाव्यात. गॅसवर काय ठेवले त्याकडे कधीकधी आपले लक्ष नसते. त्यामुळे दूध, आमटी, चहा सारखे पदार्थ ऊतू जाऊन बर्नर खराब होतो. म्हणून बर्नर अधूनमधून साफ करून घ्यावा. अन्यथा गॅसला बाहेर पडायला पुरेसा वाव मिळणार नाही आणि त्याची परिणती स्फोट होण्यामध्ये होऊ शकते. त्याचबरोबर गॅसवर काही ठेवले असेल, तर तिथे प्रथम लक्ष ठेवावे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT