ठाणे

एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात कोकणी सैनिकांचा उतारा?

अमृता चौगुले

ठाणे : दिलीप शिंदे :  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर ठाणे जिल्हा हा शिंदे यांच्या पाठीशी उभा असल्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी जुना निष्ठावान गट, शिंदे यांच्यावरील नाराज पदाधिकारी, शिवसैनिक हे खुलेआमपणे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उतरलेले दिसून येत नाही. तसेच शिवसेना वाढविणारे कोकणातील कट्टर शिवसैनिक, पदाधिकारी हे ठाकरे यांच्या सोबत असून त्यातील काही प्रमुख पदाधिकारी, जुने माजी आमदार, नगरवेकांना थेट मातोश्रीवरून बूस्टर डोसची मात्रा पाजली जात आहे. डोईजड झालेल्या पश्चिम महाराष्ट्र गटाविरोधात कोकणी शिवसैनिकांना सक्रिय केले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

ज्या शिवसेनेला पहिली महापालिकेची सत्ता मिळवून दिली आणि आजपर्यंत ती कायम ठेवली आहे, त्या ठाण्यातून बंड झाल्याने राज्यात राजकीय भूकंप घडला. दिवंगत आनंद दिघे यांनी ठाण्यासह ठाणे जिल्ह्यात शिवसेना मजबूत करीत शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे समीकरण सत्यात उतरविण्यास आयुष्य वेचले. ठाणे जिल्हा भगवेमय करण्यास दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कोकणी शिवसैनिकांनी अजोड अशी साथ दिली. त्यावेळी ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह जिल्ह्यात कोकणातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांचे वर्चस्व होते. दिघे यांच्या निधनानंतर कोकणातील शिवसैनिकांची पकड हळू हळू ढिली पडू लागली आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांना अधिक ताकद मिळत राहिली.

त्यातून ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत दोन गटांमधील संघर्ष वाढत राहिला. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी कोकणातील 9 आमदारांना सोबत नेले आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी अधिक वाढली. त्यात नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणावरून ठाणे आणि रायगडमधील भूमिपुत्र हे शिंदे यांच्याबाबत नाराज आहेत.

शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात अपेक्षित असा प्रतिसाद शिंदे गटाला मिळाला असताना उल्हासनगर, मीरा भाईंदर, कल्याण, भिवंडी, नवी मुंबईत त्यांच्या विरोधात निषेधाचा झेंडा ही फडकलेला दिसतो. यामागील कारणे ओळखून शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांनी जुन्या आणि शिंदे यांच्याबाबत नाराज असलेल्या पदाधिकार्‍यांची मोठं बांधण्याची रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. पक्ष संघटना दुसर्‍या गटाकडे जाऊ नये याकरिता मातोश्रीवरून सतत फोनवरून पदाधिकार्‍यांना सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
शिवसैनिकांची लवकरच बैठक घेणार

खासदार राजन विचारे, माजी आमदार सुभाष भोईर, हेमंत पवार, मीरा भाईंदरचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, बंड्या साळवी, अंबरनाथचे अरविद वाळेकर, बदलापूरचे वामन म्हात्रे, उल्हासनगरचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आदी प्रमुख पदाधिकार्‍यांना सक्रिय केले जात आहे. त्यातील बंड्या साळवी, म्हात्रे, राजेंद्र चौधरी यांनी उघडपणे शिंदे यांच्याविरोधात भूमिका घेतलेली दिसून येते.

तर ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, अंबरनाथमधील सुभाष साळुंखे, सुनील चौधरी यांनी शिंदे यांचे उघडपणे समर्थन केले आहे. म्हस्के यांनी शिंदे समर्थनार्थ राजीनामा देखील दिला. खासदार विचारे की भोईर यापैकी कुणावर ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी द्यायची आणि जिल्ह्यातील शिवसेना सक्रिय करायची याकरिता मुख्यमंत्री ठाकरे हे स्वतः पदाधिकारी, शिवसैनिकांची लवकरच बैठक घेणार असल्याचे समजते. त्याकरिता कोकणातील जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांना सक्रिय करण्याची रणनीती आखल्याची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT