उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाचे कट्टर समर्थक अरुण अशान यांच्या उल्हासनगच्या नेताजी चौक परिसरातील दहीहंडी उत्सवात एक अनुचित प्रकार घडला. इथे दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांच्या अगोदरच एका नशेबाज तरुणाने उंच असलेल्या दहीहंडीच्या दोरी वरून सरपटत येत दहीहंडी फोडली.
उल्हासनगर कॅम्प 5 मधील नेताजी चौकात स्वर्गीय लक्ष्मण आशान यांच्या स्मृती प्रित्यर्थ जय भवानी मित्र मंडळाने 55 हजार 555 रुपये बक्षिसाच्या हंडीचे आयोजन केले होते. या हंडीला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. पावणे अकरा वाजताच्या सुमारास एक तरुण दहीहंडीची रस्सी बांधलेल्या मनोऱ्यावर चढला. तेथून रस्सीवरून सरपटत येऊन हंडी फोडली. यावेळी रस्सी ढिल्ली करून रस्सी फोडणाऱ्याला खाली उतरविले. तेव्हा सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, रणजित ढेरे, संजय गायकवाड यांच्या पथकाने तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले. ह्या तरुणाचे नाव भोला वाघमारे (वय 22) असून तो बेघर आहे.
दरम्यान दहीहंडी फोडल्यानंतर हा तरुण उंचावरून खाली पडून त्याच्या जीव जाण्याची शक्यता होती, मात्र दहीहंडी फोडल्यानंतर आयोजकांनी ती दोरी खाली घेतली आणि या तरुणाचा जीव वाचला. दरम्यान या नशेबाज तरुणाला आता हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे गर्दीमध्ये एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे या दहीहंडी उत्सवाला उपस्थित असताना हा सगळा प्रकार घडला.