ठाणे

महिला अत्याचारसत्र सुरूच!

Arun Patil

ठाणे/अमरावती; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या पंधरवड्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने घडत आहेत. अत्याचारांचे हे सत्र अद्याप सुरूच आहे. मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला असतानाच उल्हासनगरातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. अमरावतीत मुलगी आणि महिलेवरील अत्याचाराच्या दोन घटनांच्यापाठोपाठ आणखी एका 7 वर्षीय बालिकेवरही अत्याचार झाल्याने जनमानस सुन्न झाले आहे.

मुंबईत साकीनाका येथे एका नराधमाने बलात्कार आणि अमानुष मारहाण करून एका महिलेची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करीत हातोडीने हल्ला झाल्याची घटना रविवारी (दि. 12) उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी श्रीकांत गायकवाड ऊर्फ दादा (30) यास अटक केली आहे.

उल्हासनगर स्थानकानजीक शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. शिर्डीवरून परतल्यानंतर ही मुलगी रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवरून दोन मित्रांसह घराकडे जात असताना आरोपी अचानक उगवला व त्याने तिची ओढणी खेचली. त्यानंतर त्याने मुलीच्या डोक्यावर हातोडीने प्रहार केला. मध्ये पडलात तर मारहाण करण्याची धमकी तिच्या मित्रांना देत त्याने या मुलीला जबरदस्तीने स्थानकाजवळील निर्जन रेल्वे क्वार्टर्समध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या पीडितेला त्याने बेदम मारहाण केली. शनिवारी सकाळी त्या नराधमाची नजर चुकवून मुलगी तेथून निसटली आणि घरी पोहचली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पीडित मुलीने अत्याचाराची घटना कथन केल्यानंतर तिच्या पालकांनी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री उल्हासनगरमधील श्रीराम चौक येथून गायकवाडला अटक केली. आरोपी मजुरीचे काम करतो. त्याच्यावर पोलीस दफ्तरी अनेक गुन्हे दाखल असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी सांगितले.

गायकवाडविरोधात बलात्कार, अपहरण आणि पोक्सो (लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण) कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, स्थानिक न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार यांनी दिली. हातोडीच्या प्रहारामुळे डोक्यावर जखमा झालेल्या या मुलीवर उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमरावतीत सात वर्षीय बालिकेवर अत्याचार

अमरावती : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचारासह गर्भवती मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पुन्हा सात वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी घडली.

शनिवारी रात्री उशिरा बालिकेच्या आईने तक्रार दिल्यानंतर वनोजा बाग येथील शिवम प्रदीप पातोंड या नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला. रहिमापूर चिंचोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वनोजा बाग येथे शेतमजुरी करणारी महिला मुलीला सासू-सासर्‍यांकडे ठेवून शेतमजुरीसाठी शनिवारी सकाळी शेतात गेली. त्यानंतर अकरा वाजता घरी परत आल्यानंतर तिची मुलगी रडत असल्याने विचारणा केली असता तिच्या मुलीने घडलेला प्रकार सांगितला.

साकीनाका पूर्वनियोजित?

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणार्‍या साकीनाका बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहाण पोलिसांना दाद देत नसून, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तो सरळ देत नाही. मात्र, साकीनाक्यातील भयंकर प्रकार हा पूर्वनियोजित कट असावा या दिशेने पोलिसांची तपास सूत्रे हालू लागली आहेत. मोहन चौहाण पूर्वी अंधेरी येथील असल्फा व्हिलेज परिसरात भावासोबत राहत होता. तेव्हा त्याने? पुतणीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्यावरून प्रचंड वाद झाल्यानंतर त्याला घरातून बाहेर काढण्यात आले होते. दारू आणि गांजाच्या आहारी गेलेेला चौहाण वाहनचालक म्हणून काम करत होता. त्यावेळी वाहनाचे भाग चोरताना पकडल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.

साकीनाका येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर मोहन चौहाण याने 34 वर्षांच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करून अमानुष मारहाण केली, तिच्या गुप्तांगावर घातक शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 24 तासांत गजाआड झालेला मोहन सध्या पोलीस कोठडीत आहे.

साकीनाक्यातील भयंकर गुन्हा केल्यानंतर मोहन चौहाण अंधेरी येथील संघर्षनगर परिसरात राहणार्‍या एका नातेवाईकाच्या घरी गेला होता. त्याने भूक लागल्याचे सांगितले; मात्र त्याला जेवण मिळाले नाही. तिथेच त्याने आंघोळ करून रक्ताचे डाग लागलेले कपडे बॅगेत ठेवले. आपण गावी जात असल्याचेही त्याने तेथील नातेवाईकांना सांगितलेे. या नातेवाईकाकडून तो अंधेरीच्या दिशेने रिक्षामधून जात असताना नाकाबंदीवरील पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला साकीनाक्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले.

नातेवाईकाकडे गेलेला असताना त्याने काही पुरावे नष्ट केले का, त्यासाठी त्याला कोणी मदत केली का, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी अटक केल्यांनतर मोहन चौहाण याने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत आपण त्या महिलेला मारहाण केल्याचे त्याने सांगितले.

हा गुन्हा पूर्वनियोजित होता का, याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलिसाना अत्याचारित महिलेच्या तसेच चौहाणच्या नातेवाईकाकडून व परिचितांकडून काही माहिती मिळाल्याचे सांगण्यात आलेे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT