Belapur Court Verdict
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेचे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी युवराज धोंडू भदाणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या बलात्कारासह इतर गंभीर आरोपांच्या प्रकरणात बेलापूर सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
पुराव्यांचा अभाव, फिर्यादी महिलेने न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि तपासातील उपलब्ध नोंदींचा विचार करून न्यायालयाने भदाणे यांचा डिस्चार्ज अर्ज मंजूर करत त्यांच्यावरील सर्व आरोपातून मुक्तता केली. असे असले तरी दिलीप मालवणकर हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्ली भेटीचा फोटो समाज माध्यमांवर टाकून त्यामध्ये बलात्कार गुन्ह्याचा उल्लेख करत बदनामी करत असल्याकडे लक्ष वेधत इशारा दिला.
नोव्हेंबर २०२१ मध्ये एका महिलेने तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत, नोकरीच्या शोधात उल्हासनगर महापालिकेत आल्यानंतर तत्कालीन जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी ओळखपत्र आणण्याच्या बहाण्याने तिला तुर्भे रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजवर नेऊन बनावट आधार कार्डाचा वापर करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान फिर्यादी महिलेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ज्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला ती व्यक्ती युवराज भदाणे नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भदाणे यांना आपण न्यायालयात प्रथमच पाहत असल्याचेही तिने नमूद केले.
याशिवाय, उल्हासनगर महापालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिला कार्यालयात आल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. भदाणे यांच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन घटनास्थळ किंवा तुर्भे रेल्वे स्थानक परिसरात नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. तसेच महापालिकेने संबंधित कालावधीत कोणतीही भरती प्रक्रिया जाहीर केली नव्हती.
लॉजच्या नोंदवहीत किंवा कर्मचाऱ्यांच्या जबाबांमधूनही भदाणे यांची उपस्थिती सिद्ध झाली नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांचा सविस्तर विचार करून आरोपीविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसा ठोस आधार नसल्याचे नमूद केले. त्यानुसार न्यायालयाने युवराज भदाणे यांची सर्व आरोपांतून मुक्तता करत प्रकरणाची पुढील कारवाई बंद करण्याचे आदेश दिले.
निर्णयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत युवराज भदाणे यांनी ही संपूर्ण बाब आपली जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप केला. या कथित षड्यंत्रात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे लवकरच जाहीर करून संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश करणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांचे वकील ॲड. दीपक मिश्रा तसेच युवासेना नेते विकी भुल्लर उपस्थित होते.