Youth Injured by Electricity in Ulhasnagar Thane
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प तीन परिसरातील काजल पेट्रोल पंपाजवळील कृष्णा ट्रान्सपोर्ट येथे पावसाळा पूर्व तयारी अंतर्गत प्लास्टिक पन्नी टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी विजेचा झटका लागून तरुण गंभीर जखमी झाला. संतोष आढाव असे तरुणाचे नाव आहे. ही घटना आज (दि.२४) दुपारी एकच्या सुमारास घडली.
संतोष आढाव हा तरुण पत्र्यावर काम करत असताना त्याचा संपर्क पत्र्यावरून गेलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या वाहिनीशी झाला. त्यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो जागीच भाजून निघाला. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी तत्काळ संतोषला पत्र्यावरून खाली उतरवून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.