येऊर, अनिवासी व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण होणार pudhari photo
ठाणे

Illegal construction survey : येऊर, अनिवासी व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण होणार

अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा; महापालिका, वनविभाग, पोलिसांची होणार संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या येऊरमध्ये सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामे आहेत. तेथे विवाह, पार्टी आदी समारंभ होतात. अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात, ध्वनीवर्धक, बँड, फटाके वाजवले जातात. या सर्व गोष्टी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित आहेत. त्यामुळे त्या सर्व गोष्टी तातडीने थांबण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी, सर्वप्रथम तेथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण महापालिका करणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटीसा देखील देण्यात आल्या असून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवणार्‍यांवर महापालिका, वन विभाग आणि पोलिसांकडून संयुक्तपणे कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ना विकास क्षेत्र, हरित क्षेत्र येथील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश, तसेच, राज्य सरकारने मार्च 2025 मध्ये काढलेले परिपत्रक यात अनधिकृत बांधकामाबद्दल करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई यापूर्वीच करण्यात आली आहे.

शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे. या बांधकामाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का याचीही पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटीसा पाठविण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. येऊरमध्ये महापालिका, वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.

येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी महापालिकेच्या माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्रात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक प्रदीप पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी मयुर सुरवसे, विधी अधिकारी मकरंद काळे, याचिकाकर्ते रोहित जोशी, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, सहाय्यक आयुक्त विजय कावळे आदी उपस्थित होते.

8 टर्फवर महापालिकेची कारवाई

येऊर येथील 10 अनधिकृत टर्फपैकी 8 टर्फवर कारवाई झाली आहे. दोन टर्फ मालकांनी 10 जुलैपर्यंत स्वत:हून टर्फ काढण्याचे मान्य केले आहे. त्यांनी ते न काढल्यास महापालिका त्यावरही कारवाई करणार आहे. या टर्फशिवाय आणखी 02 अनधिकृत टर्फची माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी या बैठकीत दिली. त्यापैकी एकावर महापालिकेने अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील विशेष मोहिमेत कारवाई केली आहे. तर, दुसर्‍या टर्फवर तत्काळ कारवाईचे आदेश आयुक्त राव यांनी दिले. तसेच, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात एकही अनधिकृत टर्फ सुरू ठेवता येणार नाही, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

येऊरसाठी समन्वय समिती स्थापन होणार

येऊर या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात विविध समस्या आहेत. या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी येऊरचे सर्व यंत्रणांमार्फत सुनियोजित व्यवस्थापन व्हावे यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना रोहित जोशी यांनी केली आहे. त्यानुसार, महापालिका, वन विभाग, पोलिस, महसूल, स्वयंसेवी संस्था यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती लवकरच स्थापन करण्यात येईल, असे आयुक्त राव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT