अंबरनाथमध्ये उभारला जाणार ‘महिला मॉल’ pudhari photo
ठाणे

Women’s mall : अंबरनाथमध्ये उभारला जाणार ‘महिला मॉल’

बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ; ठाणे जिल्हा परिषदेचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना सातत्यपूर्ण विक्रीसाठी मंच मिळावा, या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ तालुक्यातील बेलवली येथे जिल्हा परिषदेचा पहिला ‘महिला बचत गट उत्पादन मॉल’ उभारला जाणार आहे. या मॉलच्या उभारणीसाठी आवश्यक जागा निश्चित करण्यात आली असून, लवकरच संपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ उभी राहिली असून, सुमारे 10 हजार 800 बचत गटांमधून 1.17 लाख महिलांनी उद्यमशीलतेचा मार्ग स्वीकारलेला आहे. विविध प्रकारची उत्पादने - घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, हस्तकला, वस्त्रनिर्मिती, बागायती वस्तू - त्या तयार करतात. परंतु या उत्पादनांना सतत बाजारपेठ मिळणे हे एक मोठे आव्हान आहे. हेच लक्षात घेऊन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून हा मॉल साकारण्याचा निर्णय झाला आहे.

दरवर्षी जिल्हा व विभागीय पातळीवर सरस विक्री प्रदर्शन आयोजित केली जातात. यावर्षी ठाण्यातील गावदेवी मैदानावर भरवण्यात आलेल्या मिनी सरस उपक्रमात 188 महिला गटांनी सहभाग घेतला आणि 67 लाख रुपयांची उलाढाल केली. मात्र, ही संधी काही दिवसापुरतीच मर्यादित असते. महिलांना ‘हक्काची, कायमस्वरूपी बाजारपेठ’ देणं, हाच मॉलचा मूळ उद्देश आहे. या मॉलच्या माध्यमातून महिलांना फक्त विक्रीच नव्हे, तर उत्पादन वाढ, ब्रँडिंग आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी देखील मिळणार आहेत. वास्तुविशारद नेमणुकीची प्रक्रिया सुरू असून, संपूर्ण आराखडा अंतिम करण्यात येत आहे.

महिला सक्षमीकरणाला स्थैर्याची जोड

हा मॉल म्हणजे महिला सक्षमीकरणाचे पुढचे पाऊल मानले जात आहे. बचत गटांमधून तयार होणार्‍या उत्पादनांना केवळ हंगामी नव्हे, तर वारंवार विक्री होईल, अशी संधी उपलब्ध होणार आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका आणखी भक्कम होणार आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळाल्याने जिल्हास्तरावर नवे आर्थिक केंद्र उभे राहू शकते.

मॉडेल म्हणून इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणा

हा मॉल यशस्वी झाला, तर तो संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श ठरू शकतो. ‘विक्री केंद्र नव्हे, तर विकास केंद्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT