अनुपमा गुंडे, ठाणे
शास्त्रोक्त, विधीवत आणि शांतपणे पूजा सांगण्याच्या पद्धतीमुळे महिला पौरोहित्यांना गणेशोत्सव, नवरात्र आणि श्रावण महिन्यातील सण-उत्सवासाठी प्राधान्याने आमंत्रित केले जात आहे. राष्ट्रसेविका समितीच्या वतीने ठाण्यात महिलावर्गाला पौरोहित्याचे धडे दिले जात आहेत. जात-पात तसेच वयाचे बंधन नसल्याने या वर्गात 35 ते 80 वयोगटातील महिला पौरोहित्याचे धडे गिरवत आहेत.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना, हरतालिका पूजन आणि इतरही धार्मिक विधींना गुरूजींना यजमानांकडून आमंत्रित केले जाते. फॅमिली डॉक्टरप्रमाणे प्रत्येक कुटुंबासाठी पूजाअर्चेसाठी असणारे गुरूजी असत. पण बदलत्या काळाप्रमाणे आणि मागणीच्या तुलनेत गुरूजीची उपलब्धता कमी होत आहे. नव्या पिढीत डिजिटल माध्यमांचा आधार घेत पूजाविधी,प्रतिष्ठापना केल्या जातात. मात्र आजही अनेक कुटुंबांना गुरूजींनी, पौरोहित्यांनी पूजा सांगितल्याशिवाय ती केल्याचे समाधान वाटत नाही.
या गरजेतूनच पुरुषाप्रमाणेच महिलांना पौरोहित्य शिकता यावे, यासाठी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने ठाण्यात नौपाडा येथे पौरोहित्य वर्ग गेल्या 32 वर्षांपासून चालविले जातात. या वर्गाला वाढत्या मागणीमुळे समितीच्या वतीने े वर्तकनगर येथेही वर्ग सुरू केले आहेत. या दोन्ही वर्गांत मिळून सध्या शिक्षण घेत आहेत. पौरोहित्यवर्गाचा हा अभ्यासक्रम 4 वर्षांचा आहे. आता समाजाच्या सर्व स्तरांतील वर्गात महिलांमध्ये जागृती होत असल्याने आमच्या वर्गाला मागणी वाढली आहे. आम्ही वर्गात प्रवेश देताना जात, वय, विधवा, सधवा असे काही पाहात नाही.
पूर्वी साधारणतः पन्नाशीच्या घरातील व त्यापुढील महिला शिकण्यासाठी येत. आता 30 -35 पासून महिलावर्गासाठी प्रवेश घेत आहेत. वेदोक्त पूजा, स्त्रोत, मंत्रोच्चार पठण असे सविस्तर शिकवले जाते ते अगदी संस्कृतच्या व्याकरणापासून. महिला पूजाविधी शांतपणे सांगतात, केवळ उरकत नाहीत, आम्ही तर वर्गात महिलांना पूजेचे शास्त्रोक्त आधारही सांगतो, तेच पुरोहित यजमानांना सांगतात, त्यामुळे अनेक जणांना पूजाविधीचे सखोल अर्थ समजतात, असा आमचा अनुभव आहे, त्यामुळे महिलांना कौटुंबिक समारंभातील वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस यांनाही मंत्रोच्चार पठणासाठी बोलावले जाते. या अभ्यासक्रमानंतर अनेक महिलांनी उदक शांती, वास्तू शांत, लग्नविधीचे पौरोहित्य आत्मसात केले आहे, अशी माहिती राष्ट्रसेविका समिती महिला पौरोहित्य वर्गाच्या वरिष्ठ शिक्षिका शारदा खर्चे यांनी दिली.
गेली 32 वर्ष राष्ट्रसेविका समिती महिलांना प्रशिक्षण देत आहे. सुरुवातीला 25 ते 50 च्या घरात महिला येत असत, परंतु आता नोकरदारवर्गापासून आमच्या या वर्गाला महिला येण्यास इच्छुक आहेत. सध्या दोनशे महिला आमच्या वर्गात प्रशिक्षण घेत आहेत, गेल्या 32 वर्षांचा विचार करता सुमारे 1 हजाराच्या वर महिलांनी प्रशिक्षण घेऊन पौरोहित्य सुरू केले आहे. आमच्याकडे शिकून तयार झालेल्या अनेक पुरोहित महिलांनी वैयक्तिकरित्या पौरोहित्याचे शिक्षण देणे सुरू केले आहे, आम्ही अत्यंत नाममात्र दरात हे शिक्षण देत असल्याने आमच्याकडे महिला खूप मोठ्या प्रमाणावर विचारणा करतात, त्यामुळे भविष्यात महिला पुरोहितांची संख्या निश्चितच वाढणार आहेशारदा खर्चे, वरिष्ठ शिक्षिका, महिला पुरोहित्य वर्ग राष्ट्रसेविका समिती