डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध देऊन लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने या महिलेच्या अंगावरील 2 लाख 33 हजारांचा सोन्याचा ऐवज लुटून पळ काढला. या प्रकरणात तीन इसम सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विरुध्द कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिघे बदमाश कैद झाले असून पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी तपासचक्रांना वेग दिला आहे.
रविवारी रात्री हा प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील उचंगीदुर्ग येथे राहणाऱ्या सुनिता बेळकरी (50) या त्यांची बहिण लक्ष्मी आणि नातू कल्याण परिसरात राहत असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे काही कामानिमित्त आल्या होत्या. सुनिता पुन्हा आपल्या गावी परत जाण्यासाठी रविवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात आल्या. त्या पुद्दुचेरी एक्सप्रेसने प्रवास करणार होत्या. सुनिता यांच्या सोबत त्यांची बहिण लक्ष्मी आणि नातू होता. रात्री साडेनऊच्या सुमारास पु्द्दुचेरी एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. एक्सप्रेसमध्ये चढण्याची लगबग सुरू असताना एका अनोळखी प्रवाशाने घाईघाई करत लक्ष्मी यांना आग्रह करत गुंगीचे औषध असलेले कोल्ड्रिंक्स पिण्यास दिले. त्या प्रवाशाच्या सोबत 30 ते 35 वयोगटातील 2 इसम होते.
एक्सप्रेसमध्ये सामान्य डब्यातील सीटवर बसल्यानंतर लक्ष्मी यांना काही वेळाने गुंगी आली. या संधीचा गैरफायदा घेत तिन्ही भुरट्यांनी लक्ष्मी यांच्या गळ्यात व कानात असलेले 2 लाख 33 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. पुढील रेल्वे स्थानक येताच भुरटे उतरून पळून गेले. शुध्दीवर आल्यावर लक्ष्मी यांना आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले. बॅगा तपासल्या असता त्यातही दागिने मिळाले नाहीत. चोरट्याने दागिने लुटून नेल्याचा संशय व्यक्त करत लक्ष्मी यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
पोलिसांनी तातडीने कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तीन जण या महिले भोवती फिरत असल्याचे आढळून आले. या तिन्ही इसमांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे. सद्या सुट्टीचा हंगाम सुरू होणार आहे. कल्याणसह दिवा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांचे फलाट असलेल्या भागात हे प्रकार वाढण्याची शक्यता विचारात घेऊन लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी फलाटावरील गस्त वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.