Pradeep Purnekar Murder Pudhari
ठाणे

Pradeep Purnekar: वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाची पोस्ट… ‘पप्पा’; हजारोंच्या गर्दीत प्रदीप पूर्णेकरांना अखेरचा निरोप, जबाबात ‘त्या’ दोघांची नावे

Pradeep Purnekar Murder: ठाण्यात शिवसेना (उबाठा) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर कुटुंबीय आणि समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली.

Rahul Shelke

Pradeep Purnekar Murder: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर बुधवारी ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पूर्णेकर यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयातून कापूरबावडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत हत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.

या वेळी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी हत्येमागे काही व्यक्तींचा हात असल्याचा आरोप केला. संबंधितांची नावे पोलिसांच्या नोंदीत घेतल्याशिवाय पार्थिव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे पोलिस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने वडिलांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोसोबत त्याने केवळ ‘पप्पा’ एवढेच लिहिले. या छोट्याशा पोस्टमधून त्याने वडिलांना गमावल्याचे दुःख व्यक्त केले.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पोलिस ठाण्यात

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते.

या वेळी आदित्य ठाकरे यांनी दिवसाढवळ्या झालेल्या हत्येवर प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने तपास पुढे न्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

संजय राऊत यांनीही पोलिस प्रशासनावर कारवाईसाठी दबाव आणला. कुटुंबीयांकडे काही पुरावे असल्याचा दावा करत त्यावर तातडीने तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात निष्पक्ष आणि वेगाने तपास करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

पुरवणी जबाबात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे

पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. या दोघांचा हत्येशी संबंध असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

दरम्यान, कुटुंबीयांच्या मागणीनंतर पोलिसांनी राम पूर्णेकर यांचा पुरवणी जबाब नोंदवला. या जबाबात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे संशयित म्हणून नमूद करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली.

ही माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी पार्थिव ताब्यात घेतले. त्यानंतर प्रदीप पूर्णेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

सायंकाळी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह शिवसेना (उबाठा)चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो समर्थक उपस्थित होते. मोठ्या गर्दीत आणि भावूक वातावरणात पूर्णेकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

पूर्णेकर यांच्या हत्येमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हत्येमागे नेमके कारण काय?

प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलिस उपायुक्तांना पत्र दिले होते. त्यामुळे या भूमिकेचा हत्येशी काही संबंध आहे का, याचाही तपास करण्याची मागणी होत आहे.

याशिवाय मानपाडा परिसरातील क्लस्टर विकास योजनेवरूनही काही वाद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पूर्णेकर यांच्या हत्येमागे अमली पदार्थांच्या विरोधातील त्यांची भूमिका, क्लस्टरचा वाद किंवा अन्य कोणते कारण आहे का, हे तपासातून समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT