राजू काळे
भाईंदर: मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडून पाणी पुरवठा करण्यात येत असून या दोन्ही प्राधिकरणांकडून महिन्यातून प्रत्येक पंधरवड्यात होणारी पाणीकपात आता प्रत्येक आठवड्यात केली जाणार आहे. यामुळे शहरातील जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे शहरातील जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्याने या वर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यामुळे संभाव्य पाणी टंचाईचे संकट लक्षात घेता जलसंपदा विभाग, पाटबंधारे कळवा, ठाणे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शहराला पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण व एमआयडीसीकडून दर पंधरवड्यात पाणीकपात लागू करण्यात आली होती. यामुळे शहराला सुमारे २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.
त्यात प्रत्येक महिन्यातील पंधरवड्यात एमआयडीसीकडून दोन वेळा तर स्टेमकडून एक वेळा पाणीकपात करण्यात येत होती. पाण्याच्या या कृत्रिम टंचाईमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असतानाच दोन्ही प्राधिकरणांकडून महिन्यातील पंढरवड्याऐवजी आता प्रत्येक आठवड्यात एकूण ४८ तास पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार स्टेम प्राधिकरणाकडून दर बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) शहराला होणारा पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. तसेच एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत खंडीत केला जाणार आहे.
एकाच वेळी सलग ४८ तास शहरातील पाणीपुरवठा खंडीत केला जाणार असल्याने शहरात तीव्र जलसंकट निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी साठवून ठेवावे, अशी सूचना पालिकेकडून करण्यात आली आहे.
या कृत्रिम पाणी टंचाईच्या कालावधीत पालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पूरवठा (पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी) अत्यल्प दरात शहरातील गृहसंकुले वा इमारतींना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज मर्यादित राहून या पाण्याचा वापर कमी होईल, असा दावा केला जात आहे.