नेवाळी (ठाणे) : पाण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक गृह संकुलात पाण्याचा पुरवठा वेळेत होत नसल्याने एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र दुसरीकडे एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्यांना टॅपिंग करून नेवाळीत अनलिमिटेड पाण्याचा पुरवठा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र या पाणी चोरीकडे एमआयडीसीकडून कानाडोळा सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बदलापूरच्या बारवी धरणातून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्गाच्या कडेने गेल्या आहेत. या जलवाहिन्यांना छिद्र पाडून नेवाळीत २४ तास पाणी चोरी सुरू आहे. पैसे देऊन पाणी पाणी घेणारे नागरिक त्यांच्या हक्काच्या पाण्याला मात्र मुकत आहेत. परंतु कोणत्याही प्रकारचा पाण्याचा मोबदला न देता २४ तास अनधिकृत पाण्याची चोरी करून नागरिक आनंद घेताना दिसून येत आहेत. डोबिवली अंबरनाथ महामार्गावरील धामटण ते डावलपाडा दरम्यान सर्वाधिक पाण्याची चोरी सुरू आहे. मात्र एमआयडीसी फक्त सर्व्हिस सेंटर लक्ष करुन पाण्याच्या चोरीकडे दुर्लक्ष करत आहे.
कल्याण डोंबिवलीसह अनेक अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना व औद्योगिक क्षेत्रात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू असतो. कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर सातत्याने नागरिक एमआयडीसीला लक्ष करत असतात. लोकप्रतिनिधींना घेऊन अधिकाऱ्यांसोबत बैठकांमध्ये चर्चा करत आहेत. मात्र एमआयडीसीला पैसे देऊन पाण्याची खरेदी करणाऱ्यांना मुबलक पाणी पुरवठा करत नसल्याचे वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे या पाणी चोरीसाठी स्वतंत्र मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना छिद्र पाडून पाणी चोरीचे प्रकार सरार्स सुरू आहेत. पाणी चोरीचे कनेक्शन करून देण्यासाठी एक यंत्रणा या परिसरात कार्यरत आहे. पाण्याच्या या चोरीकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष सुरु राहिल्यास याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक स्वराज्य संस्थांना बसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरु असलेल्या पाणी चोरीकडे एमआयडिसीने वेळीच लक्ष देणं आवश्यक झालं आहे.
टॅपिंग करून गवत किंवा दगडांचा आधार !
एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना छिद्र पाडून सुरू असलेली पाणी चोरी लपवण्यासाठी दगड आणि गवताचा आधार दिला जात आहे. एमआयडीसी जलवाहिन्यांमधून सुरू असलेल्या पाणी चोरीकडे कानाडोळा करत असल्याने अनधिकृत चाळींना अधिकृत पाणी पुरवठा सुरू आहे.