नेवाळी: श्री मलंगगड परिसरातील जीवघेण्या पर्यटनाबाबत 'दैनिक पुढारी' ने सातत्याने पाठपुरावा केला होता. धोकादायक नदीपात्र, धबधबे आणि डोंगराळ भागातील पर्यटकांची बेफिकीर गर्दी वृत्तातून समोर आणली. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदीचे आदेश जारी केले.
आता त्या आदेशाच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि हिल लाईन पोलिसांनी धोकादायक ठिकाणी जनजागृतीचे फलक उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ आदेश न काढता प्रत्यक्ष उपाययोजनांकडे पाऊल टाकल्याचे चित्र दिसून येत आहे.
अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड भागात असलेल्या खरड, ढोके, आंभे, कुशिवली, श्री मलंगगड फ्युनिक्युलर परिसर आणि इतर आजूबाजूच्या भागात ‘नदीपात्रात प्रवेश निषिद्ध’, ‘धोकादायक ठिकाणी जाणाऱ्यांवर कारवाई होईल’ अशा स्पष्ट सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची माहिती देत पर्यटकांना सुरक्षिततेचे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाळ्यात या परिसरात दरवर्षी बुडून मृत्यू, पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणे आणि घसरून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने उचलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्थानिकांकडून मानले जात आहे.
श्री मलंगगड भागातील दै. पुढारी ने जीवघेण्या पर्यटनाचा मुद्दा सातत्याने मांडत प्रशासनाला वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आणि आता ग्रामपंचायत व पोलिसांकडून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. तर केवळ सूचना फलक लावून जबाबदारी संपणार नाही.
धोकादायक ठिकाणी नियमित पोलीस बंदोबस्त, बॅरिकेडिंग आणि नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई झाली, तरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अपेक्षित परिणाम दिसून येईल. अन्यथा फलकांकडे दुर्लक्ष करून जीवाशी खेळ करणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही. आता प्रशासनाच्या या मोहिमेला पर्यटक किती प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
कुशिवलीत कडक कारवाई होणार
श्री मलंगगड भागातील कुशिवली येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटकांना अटकाव करत असताना काही स्थानिक पोलिसांच्या कारवाईला विरोध दर्शवत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितला आहे. त्यामुळे कुशिवलीत पोलीस कठोर ऍक्शन घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.