Thane Building Slab Collapse Pudhari
ठाणे

Thane Building Slab Collapse: मध्यरात्री कोसळली गॅलरी; 25 रहिवाशांचे तातडीने स्थलांतर

किसननगरातील 50 वर्षे जुनी इमारत रिकामी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसननगर-3 येथे शनिवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. सुमारे 50 वर्षे जुन्या असलेल्या सुयोग निवास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

सुदैवाने घटना घडली त्यावेळी कोणीही गॅलरीत नसल्याने जीवितहानी टळली; मात्र या घटनेने जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

किसननगर-3 मधील शिव टेकडी परिसरातील शिव मंदिर गल्ली येथे असलेल्या तळमजला अधिक दोन मजली सुयोग निवास इमारतीच्या गॅलरीचा सज्जा शनिवारी रात्री सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास कोसळला.

जोरदार आवाज झाल्याने रहिवासी घराबाहेर धावले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, वागळे प्रभाग समिती, श्रीनगर पोलीस ठाणे आणि महावितरणचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने लटकत असलेला धोकादायक भाग हटवून परिसर सुरक्षित केला.

मात्र इमारतीची उर्वरित रचना धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता संपूर्ण इमारत तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले. या इमारतीत पाच सदनिका असून सुमारे 20 ते 25 रहिवासी राहत होते. सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांनी नातेवाईकांकडे तात्पुरती व्यवस्था केली आहे.

जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

गॅलरी कोसळल्याच्या घटनेनंतर किसननगर परिसरातील जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, पावसाळ्याच्या तोंडावर अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या संरचनात्मक स्थितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT