डोंबिवली : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील विजयनगर परिसरातल्या अजिंक्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. मतदान जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने कल्याण पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी स्वीप अर्थात मतदार जनजागृती पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली हा लक्षवेधी कार्यक्रम हाती घेतला होता.
या कार्यक्रमाला परिसरातील रहिवासी आणि नवतरुण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रके वाटून मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमणे बासुरीवाला ढोल-पथकाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी युवा स्टूडंट ऑयकान प्रणव देसाई, स्वीप टिमचे विलास नंदनवार, समाधान मोरे, सर्जेश वेलेकर, जितेश म्हात्रे, भारती दगडे, शिरीष म्हात्रे, आदींनी परिश्रम घेतले.