किन्हवली (ठाणे) : संतोष दवणे
चार शतकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली व संत गोरा कुंभार यांच्या वंशजांनी सुरू केलेली शहापूर तालुक्यातील ठुणे गावाची प्रसिद्ध विठ्ठल-रखुमाई यात्रा मंगळवारी ३० डिसेंबरपासून सुरू होत आहे. ठुणे यात्रेचे हे ४१४ वे वर्ष असून ३० डिसेंबर ते २ जानेवारी असे चार दिवस हजारो विठ्ठलभक्तांचा मेळा ठुणे गावात भरणार असल्याने श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्टने सर्व संबंधित मंडळे, प्रतिष्ठान यांच्या मदतीने यात्रोत्सवाची जय्यत तयारी केली आहे.
शहापूर तालुक्यातील ठुणे गावची विठ्ठलयात्रा ही शहापूर-मुरबाडसाठी श्रद्धा आणि उत्सवाचे प्रतीक मानली जाते. संत गोरा कुंभार यांच्या वारसांचे गाव असलेल्या शहापूर तालुक्यातील ठुणे गावात ४१३ वर्षांपूर्वी गोरोबांच्या वंशजांनी विठ्ठल-रखुमाई मूर्तीची स्थापना केली होती. तेव्हापासून दरवर्षी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी भव्य ग्रामदिंडी काढून यात्रोत्सव साजरा केला जातो. पूर्वी ही यात्रा १५ दिवस चालत असे. पुत्रप्राप्तीसाठी येथील विठ्ठलाला साकडे घातल्यास पुत्रप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असून शेकडो वर्षांपासून नवस बोलण्यासाठी नवविवाहित दांम्पत्ये येथे येतात व पुत्रप्राप्तीनंतर बाळाला केळी व गुळामध्ये जोखण्याचा रिवाजही पाळतात.
ठुण्यातील या विठ्ठल-रखुमाई यात्रेनिमित्त मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस काकडा, अभिषेक, हरिपाठ, भजन, कीर्तन, व पालखी अशा पारमार्थिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान जसा मुख्यमंत्र्यांना असतो तसा ठुण्यातील महापूजेचा मान शहापूरच्या विद्यमान आमदारांना दिला जातो. त्यानुसार सध्याचे शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर पुत्रदा एकादशीच्या अभिषेकांनी यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने ठुण्यात कपडे, भांडी, किराणामाल, मिठाई, खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू, महिलांची आभूषणे, पूजेचे सामान इत्यादींची दुकाने लागली असून ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांचा श्रीगणेशा ठुणे यात्रेने होत असल्याने भाविकांचा मोठा जनसागर लोटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध प्रकारचे आकाशपाळणे, साहसी खेळांचे संच लावण्याची गजबज सुरू झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक घर पाहुण्या-रावळ्यांनी भरून गेलेले आहे. यात्रोत्सवात ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील (देवाची आळंदी), ह.भ.प. आनंद महाराज जोशी (अहिल्यानगर), ह.भ.प. नितीन हरवले (पुणे), ह.भ.प. भारतीताई धसाडे (शहापूर) यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.
मार्गदर्शन, शिबिरांसह विविध उपक्रम
यात्रेदरम्यान ठाणे जिल्हा परिषद, शहापूर पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्या सौजन्याने भव्य कृषी प्रदर्शन, पशुसंवर्धन मार्गदर्शन, आरोग्य शिबीर आणि दिव्यदृष्टी चॅरिटेबल ट्रस्ट शहापूर यांच्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी या उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. ह.भ.प. कमलाकर महाराज विशे (बेडीसगाव) यांच्या मार्गदर्शना-खाली पांडुरंगाच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढून दहिहंडी व विडा दानाने यात्रेची शुक्रवारी सांगता केली जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान ट्रस्ट, ठुणेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.