ठाणे : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ठाणेवरून घोडबंदरकडे जाणार्या वाहिनीवर पातलीपाडा ब्रिजवरील रोड दुभाजकाच्या मध्ये असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवर वाहन आदळून अपघात झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री समोर आली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मंगळवारी रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास पातलीपाडा ब्रिज, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी टाटा आयशर ट्रक डीएन 09 एम 9031 हे वाहन नवीमुंबई ते गुजरातकडे सुमारे 8 टन लोखंडी पाईप व लोखंडी रॉड माल घेऊन जात होते. या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ठाणेवरून घोडबंदरकडे जाणार्या वाहिनीवर पातलीपाडा ब्रिजवरील रोड दुभाजकाच्या मध्ये असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवर वाहन आदळून अपघात झाला होता.
अपघातग्रस्त वाहनात अडकून चालक व अन्य एक असे दोघांचा मृत्यू झाला. विनोद (42 वर्षे, राहणार उत्तर प्रदेश आणि हेल्पर रहीम पठाण वय 25 वर्षे, राहणार : उत्तर प्रदेश अशी दोघा मयतांची नावे आहेत. घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस 2-हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान 1- फायर, 1- रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. यावेळी अपघातग्रस्त वाहनांमधील लोखंडी पाईप व लोखंडी रॉड रस्त्यावर पडले होते, सदर लोखंडी पाईप व रॉड हायड्रा मशीनच्या सहाय्याने एका बाजूला करण्यात आले. तसेच अपघातग्रस्त ट्रक दोन हायड्रा मशीनच्या साहाय्याने सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर रोडच्या एका बाजूला करण्यात आले. तसेच वाहनांधून रस्त्यावर ऑईल सांडले होते. त्यामुळे पातलीपाडा ब्रिजवर अपघात झाल्यामुळे ब्रिजवरील दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक सुमारे तीन तास बंद करण्यात आली होती.
सदर वाहतूक सर्व्हिस रोड वरून सुमारे तीन तास धिम्या गतीने सुरू होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सदर ठिकाणी होजरीलच्या सहाय्याने पाणी मारून रस्त्यावरील ऑईल साफ करण्यात आले व ब्रिजवरील अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.