ठाणे : वाशी येथील घाऊक कृषी उत्पन्न बाजारात भाजीपाला, फळे, सुका मेवा आणि मसाल्यांच्या दरात मोठी वाढ नोंदवली जात आहे. अनेक प्रमुख वस्तूंच्या किमती सरासरी ४० टक्क्यांनी वाढल्या असून, त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावरही झाला आहे. किरकोळ पातळीवर काही ठिकाणी १० ते २० टक्क्यांपर्यंत दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरवाढ, वाहतूक खर्चातील वाढ, तसेच आयात-निर्यात साखळीवर झालेला परिणाम यांचा थेट परिणाम कृषी मालाच्या दरांवर होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे वाहतुकीचा खर्च वाढला असून, त्याचबरोबर काही व्यापाऱ्यांकडून साठेबाजी होत असल्याने बाजारातील पुरवठ्यावरही ताण निर्माण झाला आहे. परिणामी, घाऊक बाजारातील दर वाढून त्याचे पडसाद किरकोळ बाजारात उमटत आहेत.
वाशी मार्केटमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतून विविध कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. मात्र, वाढलेले इंधनदर, साठवण खर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे दरवाढ अधिक तीव्र झाली आहे. विशेषतः भाजीपाला, फळे आणि सुक्या मेव्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
दरवाढीमुळे घरगुती अर्थनियोजन कोलमडत असून, नागरिकांना रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करताना काटकसर करावी लागत आहे. प्रशासनाने साठेबाजीवर नियंत्रण ठेवून दर आटोक्यात आणण्याची मागणी होत आहे.
कांदा : पूर्वी ८ ➝ आता २० रुपये/किलो
बटाटा : पूर्वी १० ➝ आता १८ रुपये/किलो
लसूण : पूर्वी ८० ➝ आता १६० रुपये/किलो
टोमॅटो : पूर्वी १० ➝ आता १४ रुपये/किलो
फ्लॉवर : पूर्वी ८ ➝ आता १२ रुपये/किलो
भेंडी : पूर्वी ३६ ➝ आता ४० रुपये/किलो
गवार : पूर्वी ५० ➝ आता ७० रुपये/किलो
वांगी : पूर्वी १६ ➝ आता २२ रुपये/किलो
कोथिंबीर : पूर्वी ८ ➝ आता १० रुपये/जुडी
देवगड हापूस : पूर्वी ४,२०० ➝ आता ५,२०० रुपये/पेटी
रत्नागिरी हापूस : पूर्वी ५,३०० ➝ आता ५,८०० रुपये/पेटी
कलिंगड : पूर्वी १,५०० ➝ आता २,५०० रुपये/क्विंटल
चिकू : पूर्वी ३,५०० ➝ आता ५,५०० रुपये/क्विंटल
द्राक्षे : पूर्वी १,१०० ➝ आता १,३०० रुपये/१० किलो
काजू : पूर्वी ८६० ➝ आता ४,१०० रुपये/किलो
बदाम : पूर्वी ७८० ➝ आता १,१८० रुपये/किलो
खजूर : पूर्वी १५० ➝ आता १,२०० रुपये/किलो
जिरे : पूर्वी २४० ➝ आता ३०० रुपये/किलो
हळद : पूर्वी १६५ ➝ आता २४० रुपये/किलो
दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर मोठा परिणाम होत आहे. भाजीपाला आणि फळांच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेट बिघडले आहे. इंधनदरवाढ, वाहतूक खर्च आणि साठेबाजीमुळे महागाई अधिक वाढत असून, नागरिकांना रोजच्या गरजांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.