महापौर अजीव पाटील यांचा वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केला सत्कार 
ठाणे

Vasai News | महापौर अजीव पाटील यांचा वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केला सत्कार, वसईकरांना राजकारणाच्या वेगळ्या पैलूचे दर्शन

वसईच्या राजकीय इतिहासात पहिलीच घटना, अनपेक्षित आणि अपवादात्मक प्रसंग

पुढारी वृत्तसेवा

अनिलराज रोकडे

वसई : वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात आज महापौर अजीव यशवंत पाटील यांची वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी केवळ भेटच घेतली नाही, तर महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून चक्क शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने या अनपेक्षित आणि अपवादात्मक प्रसंगामुळे वसईच्या राजकीय समन्वय, सामंजस्य आणि सो पणात परिपक्वतेची भर पडली असून, तसेच या घटनेमुळे वसईच्या सांस्कृतिक अंगाचेही दर्शन घडून आल्याचे दिसून आले. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने कार्य करण्याबाबत आपण बांधिल असल्याच्या भावनाही आमदारांनी नव्या महापौरांकडे व्यक्त केल्या असून, या त्यांच्या कुतूहली भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्यात गेली 35 वर्षे टोकाचा संघर्ष आणि विविध निवडणुकांमधील प्रचंड टोकाची आरोपबाजी वसईकरांनी अनुभवली आहे. सन 2009 साली बविआचे उमेदवार नारायण मानकर यांना पराभूत करीत, विवेक पंडित यांनी वसई विधानसभा सर केली होती. नंतर 2014 साली हितेंद्र ठाकूर यांनी कमबॅक करीत, पंडित यांचा पराभव केला. त्यानंतर पंडित राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले. मात्र ठाकूर पंडितांमधील परस्पर विरोध कायम राहिला. अलीकडील काही वर्षात पंडितांनी भाजपची साथ धरली असून, वसईच्या राजकारणातून लक्ष कमी केले आहे.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील बविआ आणि भाजप यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीत आपल्या कन्या सौ स्नेहा दुबे पंडित यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यात विवेक पंडित यांना यश आले. यावेळी भाजपच्या लाटेत स्नेहा दुबे पंडित यांच्याकडून हितेंद्र ठाकूर यांना थोड्या मतांनी मात खावी लागली. वसईत झालेल्या परिवर्तनानंतर महानगरपालिका निवडणूकपूर्व ठाकुरांचे अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक भाजपने आपल्या गळाला लावले. पालिका निवडणूकही परिवर्तनाचा नारा देऊन भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र या निवडणुकीत ठाकूर यांनी आपला गड राखलाच. शिवाय निवडणुकीपूर्वी शेखर धुरी आणि अवघ्या 48 तासापूर्वी ऍड. साधना धुरी या भाजपमधील मातब्बरांना फोडून राजकीय उट्टे काढले आहे.

अशा टोकाच्या विरोध आणि राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बविआचे संघटक सचिव आणि हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ असलेले अजीव पाटील यांची महापौरपदी निवड झाल्याबद्दल सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी पालिकेत जाऊन पाटील यांचे केवळ अभिनंदनच केले नाही, तर त्यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कारीत केले.

विशेष म्हणजे, आमदारांवर त्यांच्या 'रील' आणि समाज माध्यमावरील सक्रियतेबाबत बविआकडून सातत्याने टीका होत असतांना या प्रसंगाचे फोटो त्यांनी स्वतः समाज माध्यमावर प्रदर्शित करून वसईच्या राजकारणातील समन्वय, सामंजस्य आणि सोहार्दपणाचा नवा अध्याय लिहिला आहे.

मुळात महापौर अजीव पाटील हा एक सांस्कृतिक चेहरा आहेच, पण या बाबीला विरोधकाकडून मिळालेली दाद ही त्यांच्यासाठीही महत्त्वाची आणि गौरवाची ठरावी. त्यामुळे सौ. दुबे पंडित यांच्या या कुतूहली भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या भेटीदरम्यान शहरातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत समस्या तसेच प्रलंबित प्रश्नांबाबतही उभय पक्षी उभयपक्षी सकारात्मक व सखोल चर्चा झाली. वसई-विरार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने कार्य करण्याबाबत आपण बांधिल असल्याच्या भावनाही त्यांनी नव्या महापौरांकडे व्यक्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT