Dombivli Crime pudhari photo
ठाणे

Dombivli Crime : वरपमध्ये देवीच्या उत्सवात तलवारी, कोयत्यांचा थरार!

तरुणावर जीवघेणा हल्ला, वाहने फोडली; आठ जणांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली/कल्याण : कल्याण-मुरबाड महामार्गालगतच्या वरप गावात नवरात्रोत्सवाला सशस्त्र दहशतीचे गालबोट लागले. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सुरू असलेल्या गरबा आणि देवीच्या होमहवन कार्यक्रमादरम्यान तलवारी व कोयते घेऊन घुसलेल्या तरुणांनी एकच धुमाकूळ घातला. एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करत त्यांनी कार आणि रिक्षाच्या काचाही फोडल्या.

या प्रकारामुळे महिला, लहान मुले आणि उपस्थित नागरिकांमध्ये घबराट पसरून पळापळ झाली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

वरप गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात नवरात्रोत्सवानिमित्त देवीपूजन आणि गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी रात्री गरबा संपल्यानंतर देवीचे होमहवन सुरू असताना सशस्त्र तरुणांचे टोळके तेथे घुसले. हातातील तलवारी आणि कोयत्यांचा धाक दाखवत त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. या टोळक्याने राहुल गोंधळे या तरुणाला लक्ष्य करत त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रावरही प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची तक्रार आहे.

याशिवाय जवळ उभ्या असलेल्या कार आणि रिक्षाच्या काचा फोडण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी ही टोळी वरपमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणाचा शोध घेत सशस्त्र टोळके उत्सवस्थळी घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींचा उद्देश याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

नवरात्रोत्सवासारख्या सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमात शस्त्रे घेऊन घुसून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. उत्सवाच्या ठिकाणीच अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.

व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून, त्यातून सशस्त्र तरुणांच्या दहशतीचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे. राहुल गोंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टिटवाळा पोलिसांनी प्रतूष जाधव, विनायक मदने, रोशन चौधरी, दीपेश लोखंडे, आयुष पांडे आणि अन्य तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय नलावडे यांनी दिली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT