Vangani Illegal Chawl Action Pudhari
ठाणे

Vangani Illegal Chawl Action: वांगणीत 100 हून अधिक अनधिकृत घरे जमीनदोस्त; महसूल विभागाची धडक कारवाई

चाळमाफियांचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर: वांगणीतल्या अनधिकृत चाळींवर अखेर महसूल विभागाने हातोडा टाकला आहे. वांगणी पश्चिमेकडील एकविरा नगर भागात अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करत महसूल विभागानं 100हून अधिक घरं जमीनदोस्त केली आहेत.

या कारवाईमुळे चाळमाफियांचे धाबे दणाणले आहेत. महत्वाचं म्हणजे या चाळींमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचं वास्तव्य वाढत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या कारवाईनं गुन्हेगारांनाही चाप बसणार आहे.

वांगणी ग्रामपंचायत हद्दीत चाळ माफियांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. वांगणी पश्मिमेकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम करण्यात आले होते. सोशल मीडियात स्वस्त घरांच्या फसव्या जाहिराती करत त्याची गोरगरीबांना विक्री केली जात होती.

या चाळ माफियांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या जागेतही अवैध बांधकामे केली होती. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यानंतर वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

डिसेंबर 2025 मध्ये सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वा शिष्टमंडळाने तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेत एक निवेदनही दिले होते. त्यानंतर तहसीलदारांनी स्वत: पाहणी करून या बांधकामांबाबत आढावा घेतला होता.

या बांधकामधारकांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र ते दिलेल्या मुदतीत योग्य खुलासा करू शकले नाहीत. त्यानंतर अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी मोठ्या फौज फाट्यासह वांगणीत धडक कारवाई केली.

या कारवाईत जवळपास 100 हून अधिक घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानेही राज्य महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली आहे.

वांगणी परिसरात विविध ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू असल्याबाबत तक्रार येत होत्या. त्यात काही असामाजिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहायला येत असल्याच्या तक्रारीही पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. वारंवार नोटीस देऊन जर अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रकार थांबत नसतील तर संबंधितांवर एमआरटीपीनुसार गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यात येणार येणार आहे.
- अमित पुरी, तहसीलदार अंबरनाथ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT