ठाणे: हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही अनेकदा नाव आलेल्या आरोपींनी किरकोळ वादाचे निमित्त करून थेट फिर्यादीच्या घरावरच गुंडांसह धडक देत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
विशेष म्हणजे वाहनांचा ताफा घेऊन आरोपी फिर्यादीच्या घरावर चाल करायला गेले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वारंवार गुन्हे करूनही अशा प्रवृत्तीला लगाम का लागत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
हिललाईन पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्यादी प्रवीण पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सायंकाळी साडेचारच्या सुमारास विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ फिर्यादी हे घरी जात असताना आरोपीने त्यांच्या वाहनासमोर स्वतःचे वाहन उभे केल्याने दोघांमध्ये वाद झाला.
त्यानंतर हा वाद मिटवण्याऐवजी आरोपीने साथीदारांना पाचारण केले व थेट पवार यांच्या दारात प्रवेश केला. त्यानंतर काही वेळातच आरोपी व इतर साथीदारांनी थेट फिर्यादीच्या घरासमोर धडक दिली.
पवार यांना घराबाहेर येण्यास भाग पाडत शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीचा प्रयत्न केला. तर धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
तरीही अशा सराईत गुन्हेगारांकडून कायद्याला आव्हान देणाऱ्या घटना घडत असल्याने कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.