उल्हासनगर : उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून महिलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी यातील आठ महिलांना शोधून काढलं आहे. तर चार महिला अजूनही बेपत्ता आहेत. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सरू केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत पीटा कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर या महिलांना उल्हासनगरच्या या शासकीय महिला सुधारगृहात आणून ठेवण्यात आलं होतं. यातील काही महिलांनी काल रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन भिंतीवरून उडी मारून तर काही महिलांनी मुख्य प्रवेशद्वारावरून उडी मारून पळ काढला. दरम्यान या आधी याच परिसरात असलेल्या मुलींच्या वसतिगृहातून अनेकदा मुली पळून गेल्याच्या घटना घडल्यात. त्यात आता शासकीय महिला वस्तीगृहातील महिला पळून गेल्यानं इथल्या सुरक्षा संदर्भाचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. या प्रकरणी पोलिसांनी कॅमेऱ्या समोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय साहिंताच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 8 महिलांना रात्री उशिरा ताब्यात घेतलं असून इतर फरार असलेल्या चार महिलांचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.