उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील सेक्शन 25 येथील मरियम व्ह्यू अपार्टमेंटजवळ 27 ऑगस्ट रोजी भल्या पहाटे सकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर दगडाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेतील जखमी तरुणावर मुंबईचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
मयत रोशन सुरडकर हा योगेश नगर येथे राहत होता. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील रोशन सुरडकर याला नातेवाईकांनी तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हल्ला एवढा गंभीर होता की रोशन याचा डोळा बाद झाला होता.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत खरात तसेच पोलिस अंमलदार रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, चंदू गायकवाड, संतोष सांगळे आणि सागर मोरे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे हल्ल्याच्या दिवशीच कारवाई करत राजन गुप्ता याला त्याच्या घरातून अटक केली होती.
रविवारी सकाळी व्हेंटिलेटर वर असलेल्या रोशन सुरडकर याचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.