ठाणे

Ulhasnagar Slab Collapse | उल्हासनगरमध्ये थरार : शिवगंगा पार्क इमारतीचा स्लॅब कोसळला

सुदैवाने जीवितहानी टळली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर :  जुन्या आणि धोकादायक इमारतींचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच असून कॅम्प नंबर ३ मधील पंजाबी कॉलनी परिसरातील शिवगंगा पार्क या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी 9 वाजता घडली. या दुर्घटनेत पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर आणि चौथ्या मजल्याचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.   

  उल्हासनगर कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनी येथील 'शिवगंगा पार्क' ही इमारत सन 1996 मध्ये बांधण्यात आली होती. या 5 मजली इमारतीत एकूण 37 फ्लॅट्स आणि तळ मजल्यावर काही दुकाने आहेत. मंगळवारी सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास अचानक पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर आणि पाठोपाठ चौथ्या मजल्यावरील स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला. स्लॅब कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यामुळे इमारतीमधील नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली.

नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने इमारती बाहेर धाव घेतली. ज्या वेळी हा स्लॅब कोसळला, त्यावेळी संबंधित फ्लॅट्समध्ये नागरिक उपस्थित होते. मात्र दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली.   

  घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने कारवाई करत सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत खाली करून सील केली आहे. तसेच या इमारतीचे तातडीने स्ट्रक्च्रल ऑडिट करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीला महापालिकेमार्फत स्ट्रक्च्रल ऑडिट करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या; मात्र ही इमारत पालिकेच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट नव्हती.

नातेवाईक व मित्रमंडळीकडे नागरिकांचा मुक्काम इमारत खाली केल्यानंतर महापालिकेने बाधित नागरिकांसाठी निवारा केंद्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सर्व रहिवाशांनी ही मदत नम्रपणे नाकारली आणि ते आपापल्या नातेवाईक व मित्र मंडळींकडे आश्रयासाठी निघून गेले. दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नागरिकांनी इमारतीमधून आपले आवश्यक साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढून घेतले आहे.उल्हासनगरमधील वाढत्या अनधिकृत आणि जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने अशा इमारतींवर कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT