उल्हासनगर: उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई कॉलनी परिसरात बुधवारी उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोनू शेख आणि त्याचा मेहुणा योगेश मिश्रा यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. या रागातून बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास योगेश मिश्रा हा साथीदार धीरज विठ्ठल याच्यासोबत जात होता. त्यावेळी साईनाथ कॉलनी येथे मोनू शेख याने त्याच्या चार साथीदारांसह त्यांना गाठले. योगेश मिश्रा याच्यावर गोळीबार करीत धीरज याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. गंभीर जखमी असलेल्या योगेश मिश्रा आणि धीरज यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र योगेश मिश्रा याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्याला मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर हिललाईन पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळाला पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी भेट देत तपासला दिशा दिली. पोलीस उपायुक्तांचे आदेश व मार्गदर्शनानुसार वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली होती. वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले, पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे यांच्या पथकांनी मोनू शेख, जुनैद शेख आणि अभिमन्यू पटेल यांना अटक केली आहे. हल्ल्यात वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र इकबाल शेख हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली आहे. या आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांच्यात जुन्या कौटुंबिक वादावरून गुन्हा केल्याची कबुली अटक आरोपींनी दिली आहे. हा गुन्हा करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचे विरूध्द यापूर्वी हिललाईन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.