उल्हासनगर : ७३ वर्षीय एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल ५.७७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी तीन आरोपींसह अज्ञात व्हॉट्सअँप ग्रुपमधील सदस्यांवर भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार विष्णू परसराम कोटवाणी यांना १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.५५ पासून १४ जुलै २०२५ दरम्यान आरोपींनी फोन आणि व्हॉट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना शेअर आणि आयपीओ (IPO) खरेदी-विक्रीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. यासाठी BFSL आणि RPMTA ही ॲप्स डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून कोटवाणी यांनी वेळोवेळी आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर ऑनलाइन पैसे जमा केले. अशा प्रकारे आरोपींनी त्यांची एकूण पाच कोटी ७७ लाख दोन हजार रुपये इतकी मोठी रक्कम फसवून घेतली.
या प्रकरणातील आरोपींची नावे आशिषकुमार (मोबाईल क्र. ९१२५०७८४२८), इशिता कपूर (मोबाईल क्र. ६०३३४४३२६२) आणि अव्दिका शर्मा (मोबाईल क्र. ८८२८१३०२४१) अशी असून त्यांच्यासोबत व्हॉट्सअॅप ग्रुपमधील इतर सदस्यही या गुन्ह्यात सामील असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे सायबर फसवणुकीचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास उल्हासनगर पोलिस करीत आहेत.