ठाणे

Ulhasnagar News : उल्हासनगर हादरले! कोट्यवधींच्या इस्टेटसाठी पोटच्या मुलालाच नशामुक्ती केंद्रात सडवले! आई-बहीवर गुन्हा दाखल

धमक्या, बनावट स्वाक्षऱ्या आणि नशामुक्ती केंद्राचा गैरवापर; यादव कुटुंबातील संपत्तीचा वाद चव्हाट्यावर

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : कोट्यवधी रुपयांची कौटुंबिक मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने एका तरुणाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन नशामुक्ती केंद्रात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात त्याची आई, बहीण आणि मेव्हण्यासह पाच जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक वादातून रचला कट

तक्रारदार आचल ग्यानसिंग यादव हा उल्हासनगर कॅम्प-५ मधील भाटिया चौकात राहतो. त्याचे वडील ग्यानसिंग यादव यांची उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे, ज्यामध्ये तीन मजली 'हॉटेल आंचल पॅलेस' आणि कुर्ला कॅम्प रस्त्यावरील सात मजली 'शिव शारदा' इमारतीचा समावेश आहे. २०२३ मध्ये वडिलांच्या निधनानंतर हा वाद सुरू झाला. वडिलांनी प्रेमविवाह केलेल्या मुलगी पायल हिला कुटुंबातून बेदखल केले होते. मात्र, वडिलांच्या मृत्यूनंतर पायलने आई पूजा यादव हिच्याशी जवळीक साधून भाऊ आचलच्या विरोधात कट रचल्याचा आरोप आहे.

गुंगीचे औषध देऊन केले कैद

तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२३ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आई पूजा यादव, बहीण पायल आणि मेव्हणा अनुज कामराणी यांनी संगनमत करून आचलला प्रसादातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर अर्धवट बेशुद्ध अवस्थेत त्याला खोपोली येथील नशामुक्ती केंद्रात दाखल करून ११ जून २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२५ या काळात बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले.

तेथे नशामुक्ती केंद्रात असताना मालमत्तेचे हक्क सोडण्यासाठी आचलवर दबाव टाकण्यात आला आणि नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

बनावट स्वाक्षरीने मालमत्ता हडपली

आचल नशामुक्ती केंद्रात असताना, त्याच्या गैरहजेरीत बहीण पायलने त्याची बनावट स्वाक्षरी करून हॉटेल आंचल पॅलेसच्या भाडेकरारात फेरफार केले आणि इतरांशी नवीन करार केले. तसेच, शिव शारदा अपार्टमेंटमधील वडिलोपार्जित मालमत्तेतील आचलचा हिस्सा फसवणूक करून रिलीज डीडद्वारे हस्तगत करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पाच जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आचलची आई पूजा यादव, बहीण पायल यादव उर्फ कामराणी, अनुज कामराणी, गणेश शेट्टी आणि दीपक शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, विठ्ठलवाडी पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT