उल्हासनगर : उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक्सलंट किडू वर्ल्ड प्ले-ग्रुप शाळेतील शिक्षिका गायत्री पात्रा हिने दोन-तीन वर्षांच्या चिमुकल्याला वारंवार चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसणारा चिमुकला उल्हासनगर कॅम्प चार येथील ओटी सेक्शनमध्ये कुटुंबासह राहतो. त्याला आई-वडिलांनी कॅम्प चार मधील गुरुनानक शाळेच्या शेजारी असलेल्या एक्सलंट किडू वर्ल्ड प्ले-ग्रुपमध्ये पाठवले होते.
या चिमुकल्याच्या मोठ्या बहिणीची मैत्रीण रितिका आचार्य, जी पूर्वी या ग्रुपमध्ये शिकवत होती, शनिवारी घरी आली तेव्हा तिला चिमुकला आजारी असल्याचे समजले. रितिका आचार्यने सांगितले की, ७ ऑगस्टला कविता शिकवताना मुलाने क्लॅप न केल्यामुळे शिक्षिका गायत्री पात्रा हिने त्याला मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ पालकांनाही दाखवण्यात आला.
पालकांच्या मते, या मारहाणीनंतर चिमुकला घाबरून गेला आणि तो तब्बल पाच वेळा आजारी पडला. त्याचप्रमाणे आणखी एका बालकाने देखील तक्रार केली की, हीच शिक्षिका त्यालाही वारंवार मारते. पालकांनी शाळा प्रशासनाशी चर्चा केली असता प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप करण्यात आला. अखेर संतप्त पालकांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी शिक्षिका गायत्री पात्रा हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून ती सध्या फरार आहे आणि तिचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप असून शिक्षिकेविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.