ठाणे

Ulhasnagar Politics : उल्हासनगर महापालिकेत सत्तानाट्य! 7 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती

उल्हासनगर महापालिकेत पुन्हा राजकीय भूकंप

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : भाजपचे चार तर शिंदेसेनेचे तीन स्वीकृत नगरसेवक निवडून येणे अपेक्षित असताना, गुरुवारी पार पडलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी तथा महापौर अश्विनी निकम यांनी शिंदेसेनेचे पाच आणि भाजपचे अवघे दोन स्वीकृत नगरसेवक निवडून आल्याचे घोषित केले होते. याविरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा महानगरपालिका गटनेते राजेश वधारिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने स्वीकृत नगरसेवकांच्या या निवडणुकीला स्थगिती दिली आहे.

विशेष म्हणजे, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीचे हे प्रकरण आधी उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि पुन्हा उच्च न्यायालयात फेरविचारार्थ गेल्यानंतर गुरुवारी ही निवडणूक पार पडली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत शिंदेसेनेने तीनऐवजी पाच नगरसेवक निवडून आणले, तर भाजपचे चारऐवजी केवळ दोनच नगरसेवक निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.

या घडामोडीनंतर भाजपने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले. न्यायालयाने या निवडीला स्थगिती दिल्याने सध्या उच्च न्यायालय आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

या न्यायालयीन लढाईमुळे शिंदेसेनेकडून निवडून आलेले पंचम कलानी, हेमा पिंजानी, आशा पवार, रमेश चव्हाण, निलेश बोबडे आणि भाजपकडून निवडून आलेले धनंजय बोडारे व बाळा श्रीखंडे हे सातही नगरसेवक औटघटकेचे ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT