Ulhasnagar Municipal Election 2025
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात महायुतीच्या चर्चेला वेग आला असताना, जागावाटपासाठी समोर आलेल्या 50-50 टक्के फॉर्मुल्यामुळे शिवसेनेत नाराजी उसळली आहे. या फॉर्मुल्याची माहिती शहरात पसरताच शिवसैनिकांनी थेट खासदार कार्यालय गाठत आपली नाराजी नोंदवली. 78 सदस्यांच्या महापालिकेत अर्ध्या जागांची मागणी भाजपकडून होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात असून, हा प्रस्ताव परिस्थितीला धरून नसल्याची भावना पक्षात बळावत आहे.
2012 पर्यंत भाजपची ताकद केवळ दहा नगरसेवकांपुरती मर्यादित होती. 2017 च्या महापालिका निवडणुकीत कलानी गटाला पक्षात घेतल्याने भाजपला 32 नगरसेवकांची संख्या गाठता आली. मात्र सध्या कलानी गट हा शिवसेनेसह दोस्ती गटबंधनात असल्याने, भाजपच्या वाढीचा आधार राहिलेला हा घटक आता शिवसेनेच्या बाजूला झुकल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शिवसेनेकडे सध्याच्या स्थितीत पन्नासहून अधिक माजी नगरसेवकांची ताकद निर्माण झाली असून, त्याच्या तुलनेत 50 टक्के जागांची वाटणी म्हणजे “बेडकाने फुगून बैल असल्याचा आव आणण्यासारखी” भूमिका भाजपने घेतल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
स्थानिक पातळीवर अनेक बैठका झाल्या असल्या तरी महायुती संदर्भातील अंतिम निर्णय वरच्या पातळीवरच होणार असल्याने दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते अनिश्चिततेच्या भूमिकेत आहेत. शिवसेना आणि भाजप एकमेकांविरुद्ध लढणार असल्याची लढणार असे वातावरण मागील सहा महिन्यांपासून होते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी प्रभागामध्ये निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली होती. विविध कार्यक्रम आणि बॅनरबाजीसाठी लाखो रुपयाचा खर्च या भावी नगरसेवकांनी केला आहे. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगल्यामुळे या इच्छुकांचा मनावरील ताबा सुटत आहे.
शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची ताकद असल्याचा दावा कायम ठेवण्यात येत असून, युती झालीच तर सन्मानजनक जागावाटपाचाच पर्याय स्वीकार्य असल्याचे स्पष्ट संकेत संतापलेल्या शिवसैनिकांनी दिले आहेत. दरम्यान, भाजपकडून संघटनात्मक वाढ व मतदाराधार मजबूत झाल्याचा आधार देत समान वाटणीच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांचे दावे आणि प्रतिदावे सुरू असताना महायुतीचा तिढा अधिकच गडद होत चालला आहे. 50-50 फॉर्मुल्याला शिवसेनेचा कडवा विरोध कायम असल्याने वाटाघाटी कुठे आणि कशा स्वरूपात निकालाला जातील, याकडे आता शहरातील राजकीय वर्तुळांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाल्याने हा वाद लवकर सुटला नाही तर दोन्ही पक्ष स्वबळावर उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात महायुतीचे भविष्य अधिकच अनिश्चित बनले आहे.