Ulhasnagar Municipal Election
उल्हासनगर : उल्हासनगरात शिंदेसेना व भाजपात मनसे, टीम ओमी कलानी तसेच शिवसेना उबाठा मधून रात्री उशिरा शिवसेना आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन सकाळी ए बी फॉर्म देण्यात आले. यामुळे दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि विद्यमान नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. या नाराजीपोटी काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
सोमवारी रात्री मनसेचे उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश देण्यात आला, तर दुसऱ्याच दिवशी प्रभाग क्रमांक 13 मधून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याच प्रभागातून शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आवाज उठवल्यानंतर सुशील पवार यांच्या आई यांनाही तिकीट देण्यात आले. या प्रभागात विद्यमान नगरसेविका ज्योती माने यांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अखेर अपक्ष म्हणून अर्ज दाखल करावा लागला.
शहरप्रमुख रमेश चव्हाण यांना तब्बल सातवेळा एकाच प्रभागातून निवडून येऊनही या निवडणुकीत शेजारील प्रभागात तिकीट देण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याचा फटका प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेना शिंदे गटच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिंदेसेनेचे युवाधिकारी बाळा श्रीखंडे यांना मंगळवारी रात्री भाजपात प्रवेश देण्यात आला असून प्रभाग क्रमांक 1 मधून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. रात्रीत पक्षांतर आणि त्वरित उमेदवारीच्या या पद्धतीने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून पक्षाच्या उमेदवारांविरोधात प्रचार करण्याचा इशारा काही निष्ठावंतांनी दिला आहे. टाऊन हॉलमध्ये झालेल्या भाजपाच्या एबी फॉर्म वाटप कार्यक्रमात नव्याने प्रवेश केलेल्या आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या काही उमेदवारांनी स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकल्याचा दावा आमदार कुमार आयलानी आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या समोर केला. दरम्यान, प्रभागातील चार उमेदवारांचे एबी फॉर्म प्रभागातील स्वयंघोषित नेत्यांनी थेट नेल्याची चर्चा शहरभरात रंगली आहे.
दुसरीकडे, उल्हासनगरात पप्पू कलानी यांच्या प्रभावाखालील ओमी टीमचे कार्यकर्ते शिंदेसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून बहुतांश उमेदवारांना माजी आमदार पप्पू कलानी यांच्या हस्ते ए बी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.