शिवसेना महापौर उमेदवार अश्विनी कमलेश निकम व भाजपाचे उपमहापौर उमेदवार अमर लुंड  
ठाणे

Ulhasnagr Muncipal Corporation |उल्हासनगरच्या सत्तेत ‘वडापाव–दाल पकवान’ युती साकार

मंगळवारी होणार शिवसेना–भाजप सत्ता स्थापना, शहराच्या राजकारणात नवा अध्याय

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर :  उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोल मैदान येथे घेतलेल्या भर सभेत केलेली ‘वडापाव आणि दाल पकवान’ युतीची उपमा अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना (कलानी गट)–साई पक्ष आणि भाजप यांची अनपेक्षित पण राजकीयदृष्ट्या महत्त्वाची युती सत्तेवर आली असून शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 37 नगरसेवक निवडून आले, तर शिवसेना(कलानी गट) आणि साई पक्ष यांच्या युतीचे 40 नगरसेवक विजयी झाले. संख्याबळाच्या दृष्टीने शिवसेना युती बहुमताच्या जवळ असतानाही, राज्यस्तरीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार शिवसेना मित्र पक्षांसह भाजप एकत्र आले आणि महापालिकेत सत्ता स्थापन करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार हे सत्तासमीकरण निश्चित झाले. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

      महापौर पदासाठी शिवसेनेकडून (कलानी गट) अश्विनी कमलेश निकम यांनी, तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून अमर लुंड यांनी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी ही निवड बिनविरोध होणार असून, पिठासीन अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मराठी भाषिक अश्विनी कमलेश निकम महापौरपदी विराजमान होणार असून, सिंधी समाजातील अमर लुंड उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे शहराच्या सत्ताकेंद्रात सामाजिक समन्वयाचे चित्र दिसून येणार आहे.

   निवडणूकपूर्व काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचक विधानानुसार, ‘वडापाव’ (मराठी ओळख) आणि ‘दाल पकवान’ (सिंधी ओळख) यांची युती आता प्रत्यक्षात सत्तेत अवतरली आहे. या सत्तास्थापनेमुळे उल्हासनगरच्या विकासकामांना गती मिळेल, असा दावा सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे. स्थिर प्रशासन आणि विकासाभिमुख धोरणे राबवण्यासाठी ही युती उपयुक्त ठरेल, असा विश्वास सत्ताधारी पक्षांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयांकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT