उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांमधून महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी 3 फेब्रुवारी 2026 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या कार्यालयाने या संदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून या विशेष सभेच्या अध्यक्षतेसाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर विकास विभागाने नुकतीच महापौर पदाच्या आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांनी या निवडणुकीसंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार मुंबई प्रांतिक महानगरपालिका नियम 2005 मधील तरतुदींचा आधार घेत कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत. या विशेष सभेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांमधून शहराच्या प्रथम नागरिक आणि उपमहापौरपदाची निवड पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यांना या निवडीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अलिकडेच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर उल्हासनगरमध्ये राजकीय वातावरण तापले असताना, आता 3 फेब्रुवारीला होणाऱ्या या विशेष सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या आदेशाची प्रत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित प्रशासकीय विभागांना तातडीने कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आली आहे.