ठाणे

Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या जनता दरबारात ५५ तक्रारी; लेटलतीफ अधिकाऱ्यांमुळे नागरिक ताटकळले

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांच्या उपस्थितीत गोलमैदान परिसरातील सोमय्या हॉल येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आयोजित या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेण्यात आल्या. यावेळी एकूण ५५ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५, वैद्यकीय आरोग्य विभागाच्या १०, पाणीपुरवठा विभागाच्या १०, तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ५ तक्रारींचा समावेश होता.

उल्हासनगर शहरातील समस्यांमुळे नागरिकांमधील वाढता रोष कमी करण्यासाठी आणि समस्यांचे थेट निराकरण करण्यासाठी हा जनता दरबार दुपारी दोन वाजता सुरू झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे या गैरहजर राहिल्या. तसेच पालिकेचे मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, शहर अभियंता आणि विधी अधिकारी यांसारख्या महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांनी लेटलतीफी दाखवत तब्बल अर्धा ते एक तास उशिरा जनता दरबारात हजेरी लावली.

महापौर अश्विनी निकम यांनी वेळेवर जनता दरबार सुरू केला, मात्र संबंधित अधिकारीच उपस्थित नसल्याने ज्या विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत, त्या विभागाच्या तक्रारींना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे पहिले टोकन मिळूनही संबंधित अधिकारी गैरहजर असल्याने नागरिकांना ताटकळत बसावे लागले. महापौरांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत उपस्थित अधिकाऱ्यांना तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश दिले. यावेळी स्थायी समिती सभापती कुलवंतसिंह सोहता, नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, जमनादास पुरसवानी, दुर्गाप्रसाद राय, संघमित्रा हजारे, दिलीप जग्यासी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी विचारला जाब; दरबारात खडाजंगी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सीमा आहुजा यांनी महापौर निकम यांना गुवाहाटी अभ्यास दौऱ्याबाबत जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. "अभ्यास दौऱ्यावर ६५ लाख रुपये खर्च करता, मग शहरातील समस्या सोडवण्यासाठी पैसे का नाहीत?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर सभागृह नेते अरुण अशान यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता, "तुम्ही महापौर आहात का? तुम्ही का उत्तर देता?" अशा शब्दांत सीमा आहुजा यांनी त्यांना फटकारले. अखेर, "मी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे, तुम्ही जनतेचा वेळ वाया घालवत आहात," अशा शब्दांत महापौर निकम यांनी त्यांना सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT