उल्हासनगर : महापौर पदाची जबाबदारी स्वीकारताच महापौर अश्विनी निकम यांनी प्रशासनाला कामाला लावण्यास सुरुवात केली असून त्या पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये दिसून येत आहेत. शहरातील प्रमुख असलेल्या के.बी. रोडवर सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन सखोल पाहणी केली.
यावेळी रस्त्यांची दयनीय अवस्था तसेच अपूर्ण व संथ गतीने सुरू असलेल्या कामावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी व्यापारी संघाने रस्त्याच्या कामामुळे धूळ उडत असल्याने समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली.
पाहणीदरम्यान रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत आणि कामाच्या संथ प्रगतीबाबत महापौर अश्विनी निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. निकृष्ट दर्जाचे काम शहरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारे असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा त्यांनी दिला. रस्त्याचे काम दर्जेदार साहित्य वापरून, नियोजनबद्ध पद्धतीने व ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच भविष्यात शहरातील कोणतेही विकासकाम अपूर्ण अथवा निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही महापौरांनी ठामपणे सांगितले. नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हेच आपले प्राधान्य असून विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पाहणी प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, जमनुदास पुरसवानी, कमलेश निकम, दिलीप जग्यासी, विक्की लबाना यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. महापौरांनी घेतलेल्या त्वरित, ठाम आणि निर्णायक भूमिकेचे सर्व उपस्थितांनी स्वागत केले असून, शहराच्या विकासासाठी अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.