उल्हासनगर : रविवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर शहरात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटातच पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ झाली. नदीलगतच्या सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
उल्हासनगर कॅम्प ३ मधील पॅनल क्रमांक १२ येथील आशीर्वाद सोसायटी, रेणुका सोसायटी, सम्राट अशोक नगर तसेच भरत नगर येथील झोपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले. अनेक नागरिकांना घरे सोडून रस्त्यावर येण्याची वेळ आली. जलभरावामुळे घरांतील व दुकानांतील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, धान्य तसेच इतर घरगुती साहित्य पाण्यात भिजून खराब झाले.
अचानक पाणी शिरल्याने अनेकांना आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. वालधुनी नदीचा स्तर सकाळी सात वाजता उतरल्यानंतर घरात शिरलेले पाणी कमी झाले.
समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सांगितले की, रात्री सुमारे ३ वाजल्यापासून ते बाधित भागात पोहोचले आणि उल्हासनगर महापालिकेच्या आपत्कालीन पथकाला घटनास्थळी पाचारण करून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. महापालिकेचे कर्मचारीही संपूर्ण रात्र पाणी उपसा, जलनिकासी आणि मदतकार्यात गुंतले होते. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलभरावाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून प्रभावी पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्था उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.